
वय वर्षे अवघं पाच. मात्र, त्याची स्मरणशक्ती अफाट. एकदा कानावरून गेले, वा वाचले की त्याच्या स्मरणात ते संगणकाप्रमाणे फिट बसतं. ऐकलेली माहिती तो लगेचच एका दमात सांगतो.
इतिहास विषय तसा किचकट. इतिहासातील नावे, वर्ष, तारीख तोंडपाठ ठेवणं मोठ्यांनाही अवघड जातं. मात्र हा पाच वर्षाचा मुलगा अगदी न थांबता छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास, त्यांची शौर्यगाथा त्याला सांगतो. या चिमुकल्याचे चित्रांश मारुती आत्राम असे नाव आहे. त्याचे वडील चंद्रपूर शहरात संगीताचे मुलांना धडे देतात. पाच वर्षीय चित्रांश मारुती आत्राम याचे वडील मूळचे कोरपना तालुक्यातील अंतरगाव येथील रहिवाशी.आता ते चंद्रपूर शहरात वास्तव्यास आहेत. ते संगीताचे धडे देतात त्यांचा मुलगा चित्रांश याला बालपणा पासूनच पुस्तके वाचण्याचा छंद होता.
संगीताचीही त्याला आवड आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भाजणे तो तन्मयतेने गातो.मात्र याची बुद्धिमत्ता भारीच तलक. देशातील सर्वच राज्यांची नावे आणि जगातील एकूण 247 देशांची नावे त्याला तोंडपाठ. जराही न थांबता तो नावे सांगतो. त्याने एकदा ऐकलं किंवा वाचलं की लगेच त्याच्या मेंदूत साठवणूक झालीच समजा. संगणकासारखी माहिती साठवून ठेवणारा चित्रांश दीड वर्षाचा असताना तो खेळणी सोडून पुस्तकच चाळायचा, असे त्याचे वडील सांगतात.
त्याच्याजवळचे पुस्तक कोणी हिसकावले की तो रडायचा. पुस्तकांबाबतचा त्याचा हा लळा बघून सहज जिल्ह्यातील 15 तालुक्यांची नावे त्याला ऐकवली आणि आश्चर्य असे की, ती त्याने सर्व नावे लगेचच बरोबर उच्चारली. त्याच्या आजच्या बुद्धिमतेने अनेकांना आकर्षित केले आहे.