चंद्रपूर – शासकीय वैद्यकीय रुग्णालयात 2016 पासून अग्निरोधक यंत्रणेचा प्रस्ताव रखडला

भंडारा जिल्हा रुग्णालयात नवजात बालक उपचार कक्षात झालेल्या जळीत कांडानंतर राज्यभरात जिल्हा रुग्णालयात असलेल्या अग्निरोधी यंत्रणेची चर्चा होत आहे. त्यातही या रुग्णालयात असलेल्या नवजात बालक उपचार कक्षातील सुविधांबाबत प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.

आदिवासी आणि दुर्गम भागातील रुग्णसंख्या अधिक असलेल्या चंद्रपूर जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयात धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात 2016 पासून अग्निरोधक यंत्रणेचा प्रस्ताव रखडला आहे. इथल्या अग्निरोधक यंत्रणेच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला असता हा 44 लक्ष रुपयांचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य यंत्रणा- सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यादरम्यान पत्रव्यवहार स्तरावर टोलविला जात आहे. यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सातत्याने याबाबत पाठपुरावा करत असून, प्रत्यक्षात जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सांभाळणार्‍या जिल्हा सामान्य रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणाच नसल्याचे यामुळे उघड झाले आहे. रुग्णालय परिसरात पुरेशी- नियमानुसार पाणी टाकी उपलब्ध नसल्याने हे काम कासवगतीने पुढे जात आहे. सध्या केवळ हाताने चालवायच्या 150 अग्निशामक यंत्रांच्या भरवशावर अग्निविरोधी यंत्रणेचा भार असल्याचे वास्तव पुढे आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या