चंद्रपूरच्या अडीच वर्षीय वैदिशाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, 200 देशांची राजधानी अन् राष्ट्रध्वज तोंडपाठ

वैदिशाची लहान वयातील असामान्य कामगिरी बघून तिचे नाव ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदवून तिचा जागतिक स्तरावर गौरव झाला आहे. सध्या शेरेकर कुटुंबाचे लक्ष गिनीज रेकॉर्डवर आहे. वैदिशा ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’साठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी जोरदार सराव सुरू आहे.

चंद्रपूरची वैदिशा शेरेकर… वय वर्षे अडीच… या चिमुरडय़ा वयात दोनशेहून अधिक देशांच्या राजधानींची नावे तिला तोंडपाठ आहेत. फक्त राजधानीच नव्हे तर कोणत्या देशाचा कोणता राष्ट्रध्वज आहे हेदेखील ती फाडफाड सांगते. तिच्या या अफाट बुद्धिमत्तेची दखल ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली होती. त्यानंतर आता ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये वैदिशाने स्थान मिळवले आहे. चिमुकलीच्या या यशाने साऱयांनाच थक्क केले आहे.

वैभव शेरेकर हे मूळचे अकोला येथील आहेत. ते चंद्रपूर येथील बँकेत नोकरीला असून तिथेच स्थायिक आहेत. त्यांची वैदिशा ही एकुलती एक मुलगी. वैदिशा अवघ्या दीड वर्षाची असताना तिच्या तल्लख बुद्धिमत्तेची चुणूक तिच्या आईवडिलांना दिसून आली. तिची हुशारी बघून वैभव आणि त्यांची पत्नी दीपाली यांनी फळ, भाजीपाला, पक्षी, प्राणी यांचे चार्ट तिच्यासाठी आणले. एक-दोन दिवसांत ती अचूक पक्षी, फळे, प्राणी ओळखू लागली. त्यानंतर त्यांनी विविध देशांच्या राजधानी, तेथील राष्ट्रध्वज यांची माहिती तिला द्यायला सुरुवात केली. तिला मोबाईलमध्ये दोन-तीन दिवस सलग ही माहिती दाखवली. त्यानंतर वैदिशा न चुकता ते ओळखू लागली. मग शेरेकर दांपत्याने तिच्यासाठी विविध देशांचे चार्ट आणले.

अवघ्या 15 ते 20 दिवसांत ती 200 हून अधिक देशांची राजधानी तसेच त्यांचे राष्ट्रीय ध्वज अचूकपणे सांगायला शिकली. तिच्या या कामगिरीची दखल जानेवारी महिन्यात इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने घेतली. तिच्या नावाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली. त्यानंतर वैभव शेरेकर यांनी ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये आपल्या मुलीच्या नावाची नोंद व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला आता यश मिळाले आहे. महाराष्ट्राच्या या लेकीचे जगभरात कौतुक होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या