चंद्रपूर- पूरग्रस्त लाडज गावात बोटींच्या सहाय्याने मदतकार्य

गोसीखुर्द धरणाचे पाणी वेगाने वैनगंगा नदीत येत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या 10 गावांना महापुराने वेढले आहे. यातील लाडज- चिखलगाव -बेलगाव- बेटाळा- पिंपळगाव या गावांमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

राज्य आपत्ती निवारण दल – राष्ट्रीय आपत्ती निवारण दल याठिकाणी पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत. यात सर्वाधिक बिकट परिस्थिती आहे ती वैनगंगा नदीत बेटस्वरूप गाव असलेल्या लाडज या गावाची. 1300 लोकसंख्या असलेलं हे गाव सध्या महापुराने जलमय झाले आहे. गावात 10 ते 12 फूट पाणी असून हे पाणी वेगाने वाढत आहे.

अशा स्थितीत या गावातील नागरिकांना महापूरातून बाहेर काढण्यासाठी एकीकडे बोटीच्या सहाय्याने प्रयत्न केले जात आहे. तर दुसरीकडे वायू दलाच्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लोकांना एयरलिफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र तो अयशस्वी ठरला आहे. दुसरीकडे बोटीने सुटका झालेल्या नागरिकांना ब्रह्मपुरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात भोजन व निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली जात आहे.

सध्या सुमारे 50 नागरिकांना लाडज गावातून सुखरूपपणे ब्रह्मपुरी येथे आणण्यात आले आहे. आज रात्री लाडज या गावातील परिस्थिती कल्पनेपेक्षाही वाईट होऊ शकते. प्रशासन परिस्थितीवर नजर ठेवून आहे. लाडज गावाच्या प्रत्यक्ष स्थितीबाबत सुटका झालेल्या नागरिकांनी अंगावर काटा आणणारी कहाणी सांगितली आहे.

 पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या