Video – जेवणावरून झाला वाद, बायको आणि सुनेचा खून करून पोलिसांकडे दिली कबुली

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. आजारी पत्नीच्या देखभालीत हयगय झाल्याने संतापलेल्या इसमाने सुन आणि पत्नीचाही खून केला आहे. या हत्याकांडानंतर आरोपीने पोलिसांकडे जाऊन आत्मसमर्पण केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात झालेल्या दुहेरी हत्याकांडाने तपास करणारे पोलीस देखील सुन्न झाले. शहरातील शिवाजी वॉर्डमध्ये राहणाऱ्या काजल डे (58) यांची पत्नी ‘आशा’ यांन कर्करोग झाला होता. दीर्घकाळ रूग्णालयात राहिल्यानंतर ती नुकतीच घरी परतली होती. डायलिसिसवर असलेल्या पत्नीची सुन प्रियंका व्यवस्थित देखभाल करत नसल्याने घरात वाद होते.

आपले काम आटोपून घरी आलेल्या काजल डे यानी आजारी पत्नीला जेवण दिले का? याबाबत सुनेला विचारले. यावरून “वेळ मिळेल तेव्हा देईन” असे उत्तर मिळाल्यावर भांडणाला सुरुवात झाली. भांडण विकोपाला गेल्यानंतर आरोपी काजल याने सुन प्रियंका हिचा गळा आवळून खून केला. मात्र आपण या कृतीने कोठडीत जाऊ असे लक्षात आल्यानंतर आपल्या पश्चात आजारी पत्नीची देखभाल कशी व्हावी अशी चिंता सतावल्यानंतर त्याने मरणासन्न अवस्थेतील पत्नीचाही गळा आवळून खून केला. त्याच स्थितीत काजल डे याने बल्लारपूर पोलीस स्टेशन गाठले व आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी गाठत दोघींनाही रुग्णालयात नेले. मात्र पत्नीचा आधीच मृत्यू झाला होता. तर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासांनी सुनेचाही मृत्यू झाला. अशा रीतीने ‘जेवण देण्याच्या वादावरून’ दोघांचे जीव गेले. बल्लारपूर पोलीस ठाण्यात काजल डे यांच्या मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी काजल डे याला अटक करून बल्लारपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या