Video – चंद्रपूर मेडिकल कॉलेज रुग्णालयाच्या ऑक्सिजन विभागाबाहेर फिरतायत गाढवं, सर्वत्र पसरलंय घाणीचे साम्राज्य

कोरोनाचे संकट पुन्हा एकदा जीवावर उठले असताना चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयातील भयंकर स्थिती समोर आली आहे. ऑक्सिजन विभागासारख्या महत्त्वाच्या विभागाजवळ चक्क गाढव, कुत्रे, डुक्कर असे प्राणी फिरत असल्याचे समोर आले आहे. या जिल्हा रुग्णालयात स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. रुग्णालयात देखील घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत.

सर्वसामान्य नागरिकांसाठी अशी सामान्य रुग्णालय म्हणजे एकप्रकारे पुनर्जन्माचे ठिकाण. गोरगरिबांना याच रुग्णालयाचा मोठा आधार असतो. पण हेच रुग्णालय रुग्णांच्या जीवाशी खेळ करीत असेल तर गरिबांनी जगायचे कसे, असा प्रश्न पडतो. या  रुग्णालयाचे संचालन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत आहे. पण या संस्थेच्या प्रमुखाला रुग्णालयाच्या सोयीसुविधांशी काही देणेघेणेच उरलेले नाही, असे चित्र बघायला मिळत आहे. रुग्णालयात प्रतिनिधीने जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, तेव्हा धक्कादायक चित्र नजरेस पडले.

महत्वाच्या कक्षांसामोर कुत्री-डुकरांची हजेरी होती. वैद्यकीय कचऱ्याच्या पिशव्यांचा खच याच परिसरात पडून होता. शौचालये घाणीने माखलेली, दारे तुटलेली, ऑक्सिजन कक्षात गाढवाची उपस्थिती, जागोजागी कचऱ्याचे ढीग, प्रत्येक ठिकाणी पानाच्या पिचकाऱ्या, दुर्गंधी, इमारतीला लागूनच भंगार असे विदारक चित्र इथे दिसून आले. हे चित्र तर रुग्णालयाच्या बाहेरचे आहे. आतमध्ये यापेक्षा वेगळे नाही. रुग्णालयात जाण्याची परवानगी नसल्याने आतमध्ये नेमकी काय स्थिती आहे, याचे चित्र समोर येऊ दिले जात नाही.

गेल्या महिनाभरापासून येथील स्वच्छता कर्मचारी आंदोलन करीत आहेत. पाच महिन्यांचे त्यांचे वेतन थकल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. ज्यांच्या खांद्यावर रुग्णालयाच्या स्वच्छतेचा भार आहे, त्याच स्वच्छतादूतांना पाच-पाच महिने वेतन नाही. त्यांच्या समस्येवर तोडगा काढायला डीनकडे वेळ नाही. असे चंद्रपूरचे कामगार नेते पप्पू देशमुख यांनी सांगितले.

आता कोरोनाने नव्याने तोंड वर काढले आहे. रुग्ण वाढत चालले. अशा गंभीर स्थितीत रुग्णालयाची ही केविलवाणी स्थिती असेल, तर कोरोनाशी कसे लढायचे, असा प्रश्न पडतो. रुग्णालयाची स्थिती एवढी गंभीर असूनही शासकीच वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अरुण हुमने हे बोलायला तयार नाहीत. त्यामुळं हे रुग्णालय सध्या रामभरोसे असल्याचे दिसून येते.

‘ग्रामीण रुग्णालयांची स्थिती सध्या बऱ्यापैकी असली, तरी रिक्त पदांची समस्या मोठी आहे. त्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार येत आहे. जिल्ह्यात 9 ग्रामीण रुग्णालये, चार उपजिल्हारुग्णालये आहेत. त्यात वर्ग एकची अकरा पदे, वर्ग दोनची 20 टक्के पदे, वर्ग तीन आणि चारची 25 पदे रिक्त आहेत. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी पाठपुरावा केलाय, पण त्याला शासनाकडून पाहिजे तो प्रतिसाद नसल्याने आहे त्या मनुष्यबळात कामकाज करावे लागत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या