चंद्रपूर – आमदाराने पकडला दारूचा साठा, 7 टेम्पो पोलिसांच्या हवाली केले

liquor Liqueur

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर इतर जिल्ह्यातून दारूतस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे. चंद्रपूरचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी मंगळवारी रात्री 10 च्या सुमाारास बुलडाणा जिल्ह्याचे पासिंग नंबर असलेले टेम्पो पकडले. या टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत.  जोरगेवार यांनी शहराच्या एंट्री पॉईंटवर पाळत ठेवून शहरात येणारा सात वाहनांतील देशी दारूचा साठा पकडून तो पोलिसांच्या हवाली केला. या दारु तस्करीबद्दल आपण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना कल्पना दिली होती, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप जोरगेवार यांनी केला आहे.  जोरगेवार यांनी पोलीस निरीक्षक खाडे यांना जेव्हा फोन केला तेव्हा त्या दोघांमध्ये शाब्दीक चमकमक उडाल्याचं कळतं आहे.

मंगळवारी रात्री शहराचे प्रवेशद्वार असलेल्या पडोली चौकात आमदार जोरगेवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाळत ठेवली होती. त्यांना माहिती मिळाली होती की शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर देशी दारू आणण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी सात टेम्पो अडवले आणि त्यांची पाहणी केली, यावेळी त्यांना या टेम्पोंमध्ये देशी दारूचे खोके सापडले.  हे टेम्पो आणि दारू पोलिसांच्या हवाली केल्यानंतर जोरगेवार यांनी आरोप केला आहे की दारूबंदीच्या अनुषंगाने पोलिसांकडून होत असलेली कारवाई आता थंडावली आहे.

ही वाहने चंद्रपूर जिल्ह्यातील नाकेबंदी चुकवून जिल्हा मुख्यालयापर्यंत कशी पोहोचली हा प्रश्न निर्माण झाला आहे. या दारूतस्करीप्रकरणी पडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 7 टेम्पोंच्या वाहक-चालकांना वाहनासह ताब्यात घेतले गेले आहे. पोलीस ही कारवाई करत असताना आमदार जोरगेवार यांच्यासह  शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे हे देखील तिथे हजर होते. जोरगेवार इशारा दिला आहे की त्यांच्या मदतदारसंघात ते अवैध दारूचे धंदे चालू देणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या