
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी दूषित पाणी पिल्यामुळे अतिसाराने एका बालकाचा मृत्यू झाला होता. या बालकाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी वैभव डहाणे यांनी टॉवरवर चढून आंदोलन केले. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अखेर 12 तासांची आंदोलन थांबवण्यात आले.
जिल्ह्यातील वरोरा शहरातील मालवीय वार्डामध्ये वरोरा नगरपरिषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. चार जुलै रोजी मानवीय प्रभागातील सुभाष पांढरे यांच्या कुटुंबासह अनेकांना दूषित पाणी पिल्यामुळे अतिसाराची लागण झाली होती. त्यामुळे दहा वर्षांच्या बालकाचा उपचारादरम्यान 5 जुलै रोजी मृत्यू झाला. नगरपरिषदेच्या माध्यमातून दूषित पाणी सोडल्याने बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. नागरिकांचा रोष पाहता वैभव डहाणे यांनी पुढाकार घेतला. पाणीपुरवठा करणाऱ्या विदर्भ मल्टी सर्विसेस कंपनीला काळ्यायादीत टाकावे. तसेच कंपनीवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून मृत बालकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन वैभव डहाणे यांनी काही दिवसांपूर्वी प्रशासनाला दिले होते. तसेच मागण्या मान्य झाल्या नाही, तर आंदोलनाचा इशारा दिला होता. मागण्या मान्य न झाल्यामुळे आज (19 जुलै) सकाळी सहा वाजता वरोरा येथील तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले. बारा तास चाललेले आंदोलन अखेर लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे, शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे, शिवसेनेचे मनीष जेठानी आणि माजी नगराध्यक्ष विलास टिपले इत्यादी लोकांनी आंदोलनस्थळी भेट दिली.