वाघाची दहशत, 50 वर्षांची परंपरा असणारी मारुती देवस्थानची यात्रा स्थगित

1013

एखाद्या वाघाची दहशत किती असावी, याचा प्रत्यय चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना येत आहे. वाघाच्या दहशतीने चक्क यात्राच स्थगित करावी लागल्याची स्थिती चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहराजवळ असलेल्या प्रसिद्ध मारुती देवस्थान जोगापूर इथं निर्माण झाली. 50 वर्षांची परंपरा असणाऱ्या या यात्रेवर वाघाच्या दहशतीचे सावट असून भाविकांना दर्शनापासून वंचित राहावे लागले. वनविभागाने मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी यात्रा स्थगित केली असून, चारचाकीने देवदर्शनास मात्र मुभा देण्यात आली आहे

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा उपविभाग म्हणजे तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेला भाग. या भागातील दोन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या टेकड्या म्हणजे पट्टेदार वाघांचे वास्तव्य असलेले क्षेत्र. राजुरा शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या जोगापूर येथील प्रसिद्ध मारुती मंदिरात मार्गशीर्ष महिनाभर मोठी यात्रा भरते. या यात्रेत लाखोंच्या संख्येने भाविक येतात. यात्रेनिमित्त या भागात स्थायी दुकाने व हजारो नागरिकांचा वावर असतो. मात्र यंदा जोगापुर मंदिर परिसरात वाघांचे सहज दर्शन होत असल्याने व हा आकडा चारवर पोचल्याने वनविभागाने इतिहासात पहिल्यांदाच जोगापूरची यात्रा स्थगित केली आहे. परिसरात शुकशुकाट बघायला मिळतो. मात्र, देवदर्शनास मुभा देण्यात आली असून, केवळ चारचाकी वाहनाने जाण्यास ही मुभा आहे. मंदिर मार्गावर जाणाऱ्या अनेक भक्तांना अशाप्रकारे वाघाचे दर्शन होत आहे. या भागात सध्या वनविभागाने तात्पुरता नाका निर्माण करत वाहनांचे आवागमन रोखले आहे. त्यामुळे भाविकांचा हिरमोड झालाय.

maruti

जोगापूर परिसरात वाघांचे वास्तव्य अधिक संख्येत दिसत असल्याने पुढील संघर्ष व समस्या टाळण्यासाठी वनविभागाने ही पावले उचलली असल्याची माहिती वनविभाग अधिकाऱ्यांनी दिली आहे. या परिसरातील वाघांवर नजर ठेवली जात असून, त्यांच्या रोजच्या हालचालींचे निरीक्षण केले जात आहे. कुठलीही अप्रिय घटना टाळण्यासाठी यंदा जोगापूर देवस्थानात दर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. एकट्या- दुकट्याने या भागात फिरू नये, असा इशारादेखील वनविभागाने दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या