नामकरणाच्या कार्यक्रमाला जाताना गाडी उलटली; एकाच गावातील 31 जण जखमी

नामकरणाच्या कार्यक्रमासाठी जात असताना मालवाहक गाडी उलटली. या अपघातात 31 जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांपैकी 8 जणांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गडचिरोलीला हलविण्यात आले आहे. ही घटना ब्रम्हपुरी टिळक नगर मार्गावर घडली. जखमी झालेले सर्व लोक रनमोचन या गावातील आहेत.

ब्रम्हपुरी तालुक्यातील रनमोचन गावातील 31 जण नामकरणाच्या कार्यक्रमासाठी भंडारा जिल्ह्यातील भागडी येथे निघाले होते. हे सर्व मालवाहक गाडीत बसून जात होते. ब्रम्हपुरी येथील टिळक नगर दत्त मंदिराजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व त्यामुळे गाडी उलटली. या अपघातानंतर आरडाओरड सुरू झाली. अपघाताची माहिती जवळपास असलेल्या लोकांनी मिळताच त्यांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढले.या घटनेत 31 जण जखमी झाले असून जखमींमध्ये महिला व बालकांचादेखील समावेश आहे.

जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील गंभीर जखमींना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. गंभीर जखमींमध्ये प्रियंका दोनाडकर, प्रमिला भर्रे, रागिना बुराडे, जागृती दोनाडकर, योगिता दोनाडकर, अनुसया राऊत, ज्योत्सना बुराडे, आदेश बुराडे यांचा समावेश आहे.

चालक बदलला अन्..

गावातील 31 जणांना घेऊन मालवाहक गाडी निघाली. ब्रम्हपुरी येथील बारई तलावा जवळ चालकाने गाडी थांबविली. पहिला चालक उतरला. त्याजागी महेश दिघोरे नामक चालकाने स्टेरींग हातात घेतली अन् काही वेळाने हा अपघात घडला.