वीज जाणं जीवावर बेतलं, जनरेटरच्या धुरामुळे गुदमरल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

वीज जाणं एका संपूर्ण कुटुंबाच्या जीवावर बेतलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर भागात ही दुर्घटना घडली आहे. जनरेटरच्या धुरामुळे हे कुटुंब गुदमरून दगावल्याचं सांगण्यात येत आहे. दुर्गापूर भागात राहणारे कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासहित कुटुंबातील सात जणांचा धुराने गुदमरून मृत्यु झाला.

मृतांमध्ये अजय लष्कर (21), रमेश लष्कर (45), लखन लष्कर (10), कृष्णा लष्कर (8), पूजा लष्कर (14), माधुरी लष्कर (20) यांचा समावेश आहे. रात्रीच्या सुमारास झालेल्या या गॅसगळतीमध्ये एकाच कुटुंबातील हे सातजण बेशुद्ध पडले. लष्कर कुटुंब राहत असलेल्या घरातून येत असलेला धूर पाहून शेजारापाजारच्यांना काहीतरी आक्रित घडलं असावं अशी भीती वाटली होती.

दार ठोठावूनही कोणी न उघडल्याने ते तोडण्यात आलं. आतमध्ये लष्कर कुटुंबातील 7 जण बेशुद्धावस्थेत असल्याचं दिसून आलं होतं. या सगळ्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे सहा जणांना मृत घोषित करण्यात आलं होतं. तर दासू लष्कर (40) यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दहा दिवसांपूर्वी या कुटुंबात विवाह झाला होता. त्यानंतर लगेच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या