
जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक संपावर गेल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याचे चिन्ह दिसताच विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे यासाठी आंबोली ग्रामपंचायतने पुढाकार घेत शाळा सुरु केली आहे. विशेष म्हणजे, गावातील तरुण – तरुणींसोबत स्वतः सरपंच शालिनी दोतरे व उपसरपंच वैभव ठाकरे हे दोघंही शिक्षकाची भूमिका पार पाडत आहे.
जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील आंबोली हे तीन हजार लोकवस्तीचे गाव असून, या गावात पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत अडीचशे विद्यार्थी आहे. जुनी पेंशन योजना लागू करावी यासाठी राज्य भरात शिक्षकासह सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत, या संपा मध्ये जिल्हा परिषद आंबोली गावातील शाळेच्या सर्व शिक्षकांनी सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गावात भटकंती सुरू होती. पण विद्यार्थ्यांचे ऐन परीक्षेच्या काळात शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आंबोली ग्रामपंचायतने पुढाकार घेतला गावातीलच उच्च शिक्षित युवकांची सभा घेऊन जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा संप मिटत नाही तोपर्यंत सर्वांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे द्यावे व आपला अमूल्य वेळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी देण्यात यावे, अशी संकल्पना या युवकासमोर मांडली. गावातील युवकांनी हा प्रस्ताव स्वीकारला. सरपंच शालिनी दोतरे, उपसरपंच वैभव ठाकरे सह गावातील शिक्षित युवा हे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे देत आहेत.