
वरोरा-चंद्रपूर-बल्लारपूर-बामणी टोल रोड लिमिटेड,नागपूर या कंपनीला सार्वजनिक बांधकाम विभागाने एक नोटीस बजावली आहे. या कंपनीकडे राज्य मार्ग 264 या टोल असलेल्या रस्त्याच्या देखभालीचे आणि दुरुस्तीचे काम आहे. मात्र ही कंपनी यामध्ये कुचराई करत असल्याचे निदर्शनास आल्याने सा.बां.विभागाने ही नोटीस बजावली आहे. या कंपनीला रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी मागील 2 वर्षात 18 पत्रे पाठविण्यात आली होती. मात्र यातील एकाही पत्राला कंपनीकडून दाद देण्यात आली नव्हती.
चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की राज्यमार्ग क्र.264 या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून पांढरे पट्टे, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे, स्पीड ब्रेकर व त्यावरील पट्टे हे दिसेनासे झालेले आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याची चिंता पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या पत्रात व्यक्त केली होती. रा रस्त्यावर टोल बसविलेला असून रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. असं असतानाही या रस्त्याची देखभाल करण्याचे तसेच दुरुस्तीची कामे करण्यात आलेली नाहीयेत. 13 डिसेंबर 2021 रोजी सार्वजकिन बांधकाम विभागाने या कंपनीला पत्र पाठवलं होतं, ज्यात 17 ठिकाणी डांबरीकरीण करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं.