चंद्रपूर- संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 25 लाखांची दंड वसुली

मार्च महिन्याच्या मध्यापासून राज्यात कोरोना साथरोग संकट संचारबंदीचे नियम लागू आहेत. या चार महिन्यांच्या काळात विविध शहरांमध्ये नागरिकांच्या मुक्त फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर वाहतूक पोलीस विभागाने तब्बल 25 लाख रुपयांची दंड वसुली केल्याचे पुढे आले आहे.

चंद्रपूर वाहतूक पोलीस विभागाने दंडाची ही रक्कम सुमारे 24 हजारांहुन अधिक प्रकरणात वसूल केली आहे. जिल्ह्यातील सीमा बंद असताना जिल्ह्यात विनापरवाना दाखल होणाऱ्या वाहनांसह मास्क न घालता फिरणे, संचार बंदीचे उल्लंघन करणे, दुचाकी वाहनावर एकापेक्षा अधिक व्यक्ती बसवून फिरणे अशा अनेक प्रकरणात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यापुढच्या काळातही कोरोना संचारबंदी व नियमांचे उल्लंघन केल्यास अशाच पद्धतीच्या कारवाईचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात एकीकडे दारूबंदी अंमलबजावणीची मोठी जबाबदारी पोलिसांवर असताना आता कोविड संचारबंदीच्या निमित्ताने अधिक जबाबदारी पार पाडावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी केलेली ही कारवाई वाहनधारकांसाठी इशाराच ठरली आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या