अधिकारी, कर्मचारी संपावर; मग शिक्के मारणारी ही महिला कोण? सरकारी कार्यालयातील खळबळजनक व्हिडीओ व्हायरल

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यभरातील सरकारी कर्मचारी गेल्याकाही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. अधिकारी, कर्मचारी वर्ग संपावर असताना चंद्रपुरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. कार्यालयामध्ये एकही कर्मचारी उपस्थित नसताना एक महिला नवीन बार आणि वाईन शॉपच्या परवानगी व नुतनीकरणाच्या कागदपत्रांवर भराभर शिक्के मारताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

शिक्के मारत असताना महिलेने आपण चपराशी असल्याचे सांगितले. मात्र संपादरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली होती? महत्त्वाच्या कागदपत्रांवर शिक्के मारण्याचे अधिकार या महिलेला कोणी दिले? अधिकारी, कर्मचारी वर्ग संपावर असताना ही महिला कार्यालयात कशी आली? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, मार्च महिना सुरू असल्याने बार आणि वाईन शॉपच्या लायसन्सचे नुतनीकरण करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अनेकांनी कागदपत्र जमा केलेली आहेत. मात्र अधिकारी, कर्मचारी वर्ग संपावर असताना या महिलेवर ही जबाबदारी कोणी सोपवली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच अधिक्षकांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.