चंद्रपूर – आई बनली दुर्गा, बिबट्याच्या मुखातून मुलीला वाचवले

पोटच्या गोळ्यावर जेव्हा संकट येते, तेव्हा आई कशी दुर्गेचे रूप धारण करते, याचा प्रत्यय आणून देणारी घटना चंद्रपुरात उघड झाली. चक्क बिबट्याच्या मुखातून आपल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला या मातेने सुखरूप बाहेर काढले. आईच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चंद्रपूर शहरालगत जंगलाने वेढलेले जुनोना गाव आहे. याच गावात मेश्राम कुटुंब राहते. आई अर्चना मेश्राम मुलीसह गावालगत नाल्याजवळ राभाज्या तोडण्यासाठी गेली. भाज्या तोडत असताना अर्चना समोर निघून गेली, पण पाच वर्षांची चिमुकली प्राजक्ता तिच्या नजरेच्या टप्प्यात होती. एवढ्यात तिथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने चिमुकल्या प्राजक्तावर झडप घातली आणि तिचे शीर जबड्यात धरले. अचानक झालेल्या या हल्ल्याने आई अर्चना जराही न घाबरता मुलीच्या सुटकेसाठी धावली. तिथे पडलेली लाकडाची काठी उचलून सर्व शक्ती एकवटून बिबट्यावर जोरदार प्रहार करू लागली. तेव्हा बिबट्याने तिच्यावरही हल्ला चढवला. पण काठीच्या मदतीने हा हल्ला तिने परतावून लावला. मातेच्या या रुद्रावतारापुढे बिबट्याला शेवटी माघार घ्यावी लागली. पण बिबट्याने पुन्हा दुसऱ्या वेळेस चिमुकलीला पकडत फरफटत नेऊ लागला.  तीने पुन्हा बिबट्यावर प्रहार केल्यावर बिबट्या पसार झाला.

घटनेनंतर जखमी अवस्थेतील बेशुद्ध प्राजक्ताला घेऊन आईने तातडीने रुग्णालय गाठले. चंद्रपुरात उपचार झाल्यावर सध्या प्राजक्ता नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात चेहऱ्याच्या पक्षाघातावर उपचार घेत आहे. पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी या मातेने जीवाची बाजी लावली आणि मृत्यूच्या रुपात आलेल्या बिबट्याला आईमध्ये दडलेले दुर्गेचे रूप दाखवले.

आपली प्रतिक्रिया द्या