तोच चंद्रमा कवेत ! चांद्रयान-2 पुढे झेपावतंय; 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत

123

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

चांद्रयान-2 हिंदुस्थानचे सर्वात शक्तिशाली रॉकेट जीएसएलव्ही एमके-3 द्वारे प्रक्षेपित केले गेले. प्रक्षेपणानंतर अवघ्या 16 मिनिटांत ते पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले . तेथे ते 16 दिवस पृथ्वीची परिक्रमा करून नंतर चंद्राकडे झेपावणार आहे. यादरम्यान, त्याची कमाल गती 10 कि.मी. प्रतिसेकंद आणि किमान गती 3 कि.मी. प्रतिसेकंद असेल.

21 दिवसांनंतर चंद्राच्या कक्षेत

16 दिवसांनंतर पृथ्वीच्या कक्षेतून चांद्रयान-2 बाहेर पडेल. यावेळी चांद्रयान-2मधून रॉकेट वेगळे होईल. पाच दिवसांनंतर चांद्रयान-2 चंद्राच्या कक्षेत पोहोचेल. यादरम्यान त्याची गती 10 कि.मी. प्रतिसेकंद आणि किमान गती 4 कि.मी. प्रतिसेकंद असेल. यानंतर चंद्रावरील लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल.

घरदार सोडून सात दिवस आमची टीम  झटली, त्याचे फळ मिळाले!

गेले सात दिवस इस्रोचे संशोधक आणि अन्य स्टाफ घरदार सोडून चांद्रयान – 2 च्या प्रक्षेपणाची पूर्वतयारी करीत होता. देहभान विसरून आम्ही केलेल्या कामाचे आज चीज झाले. मी माझ्या सर्व सहकार्‍यांना मनापासून सलाम करतो. चांद्रयानाच्या यशस्वी प्रक्षेपणाने आपण मोठे यश मिळवलेय. तुमच्या समर्पित कार्याला 130 कोटी देशवासी मोठय़ा अभिमानाने वंदन करतील, अशी प्रतिक्रिया इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी व्यक्त केली. ही प्रतिक्रिया व्यक्त करताना सिवान अतिशय भावनाविवश झाले होते. आपल्या सहकार्‍यांचे अभिनंदन करताना ते सदगदित झाले होते.  चांद्रयान – 2 चे यशस्वी प्रक्षेपण हे केवळ इस्रोसाठीच नव्हे तर देशाच्या तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे. ‘चांद्रयान – 2’चे यशस्वी उड्डाण हा आपल्या तिरंग्याचा सन्मान आहे, अशी भावना व्यक्त करीत आता पुढच्या मोहिमेची तयारी सुरू करणार असल्याचे सिवान यांनी जाहीर केले.

दक्षिण ध्रुवच का निवडलं ?

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-2 हे चंद्राकरील भौगोलिक वातावरण, खनिजं आणि पाणी यासंदर्भातील माहिती देणार आहे. मिशन मून अंतर्गत चांद्रयान-2 हे अजूनही फारसे संशोधन न झालेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. चंद्राचा विषवृत्तीय प्रदेश इतर भागाच्या तुलनेत थोडा सपाट असल्याने या प्रदेशामध्ये चांद्रयान उतरली आहेत. मात्र चंद्राचा दक्षिण धुक्र दऱ्याखोर्‍यांचा आणि खडबडीत पृष्ठाचा आहे. त्यामुळे आतापर्यंत या धुवावर कोणताही देश गेलेला नाही. त्यामुळे दक्षिण ध्रुवाबाबतची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. चंद्रावरील भौगोलिक वाताकरण, खनिजं आणि पाणी यासंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी दक्षिण ध्रुवाची निवड ही लँडिंगसाठी करण्यात आली आहे. चांद्रयान-1दरम्यान दक्षिण ध्रुवावर असलेल्या बर्फासंबंधित काही माहिती मिळाली होती. तेव्हापासून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबाबत कुतूहल निर्माण झाले आहे. स़ॉफ्ट लँडिंग करण्यात हिंदुस्थान यशस्वी झाल्यास असे करणारा तो जगातील चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन यामध्ये यशस्की झाला आहे. चंद्राचा पृष्ठभाग, चंद्राचा गाभा आणि बाह्य वातावरणाचा अभ्यास करून चंद्रावरील पाण्याचे मूळ शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दक्षिण ध्रुवावरील भूरचना, खनिज, त्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणे तसेच तेथे कोणत्या स्वरूपात पाणी उपलब्ध आहे की नाही याबाबत माहिती मिळणार आहे.

नासा 2024मध्ये पाठवणार चंद्रावर महिला

चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या ऐतिहासिक घटनेला 20 जुलैला 50 वर्षे पूर्ण झाली. नासाच्या अपोलो-11 यानातून गेलेल्या अंतराळवीरांनी ही मोहीम फत्ते केली. या पार्श्वभूमीवर, नासा 2024मध्ये चंद्रावर पहिली महिला अंतरळवीर आणि पुरुष अंतराळवीर पाठवणार आहे. ‘अर्टमीस’ असे या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे नाव आहे. नासाने म्हटले, चंद्रावर पुन्हा पाऊल ठेवून मंगळावर स्वारी करण्याचा आमचा विचार आहे. 2024च्या चंद्रावरील मोहिमेत आतापर्यंत माहीत नसलेल्या गूढ गोष्टींची उकल करण्याचा प्रयत्न असेल.

इस्रोची 2020मध्ये सूर्यावर स्वारीचांद्रयाननंतर आता आदित्य एल-1’

चांद्रयान-2च्या आज यशस्वी प्रेक्षपणानंतर 2020मध्ये सूर्यावर स्वारी करण्याची तयारी इस्रोने केली आहे. ‘आदित्य एल-1’ असे या सूर्य मोहिमेचे नाव असून 2020च्या मध्यात ते सूर्याकडे झेपावणार आहे. सूर्याच्या तेजोवलयाचा, प्रभावलयाचा अभ्यास करण्याचे काम यात केले जाणार आहे. आदित्य एल-1 हे यान सूर्याच्या बाहेरीतील प्रभावलयाचा, बाहेरील बाजूचा अभ्यास करणार आहे. सूर्याचा अभ्यास करणार्‍यांना अजूनही प्रभावलयांबद्दल काहीच माहिती मिळालेली नाही. त्यामुळे त्याच्या अभ्यासासाठी ही मोहीम असेल, अशी माहिती इस्रोने त्यांच्या संकेतस्थळावर दिली आहे.

चंद्राच्या भूमीवर उतरण्याआधी

पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील अंतर सुमारे 3 लाख 84 कि.मी. आहे. चांद्रयान-2मधील लँडर ’विक्रम’ आणि रोव्हर ‘प्रज्ञान’ प्रत्यक्ष चांद्रभूमीवर उतरणार आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या 4 दिवस आधी रोव्हर विक्रम चांद्रयानापासून वेगळे होईल आणि चांद्रभूमीच्या आणखी जवळ पोहोचेल. तेथून लँडिंगच्या जागेचं स्कॅनिंग करेल. त्यानंतर विक्रम चांद्रभूमीवर लँड होईल आणि त्याचा दरवाजा उघडेल आणि रोव्हर प्रज्ञान बाहेर पडेल. ही प्रक्रिया सुमारे चार तास चालेल. एकदा का रोव्हर चांद्रभूमीवर चालू लागला की पहिल्या 15 मिनिटांत इस्रोकडे या लँडिंगची छायाचित्रे येण्यास सुरुवात होईल.

लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करून रोव्हर सोडणार

पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या असलेल्या चांद्रयान-2मध्ये एकूण 13 पेलोड आहेत. यापैकी 8 पेलोड ऑर्बिटरमध्ये, तीन लँडर विक्रममध्ये आणि दोन पेलोड रोव्हर प्रज्ञानमध्ये आहेत. या 13 पैकी 5 हिंदुस्थानचे , 3 युरोप, 2 अमेरिकेचे तर एक बुल्गारियाचा आहे. लँडर ’विक्रम’ चं नाव हिंदुस्थानी अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम ए. साराभाई यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.

चांद्रभूमीची माहिती

चांद्रयान -2 मधील 13 पेलोड्स तेथील खनिजे, मातीचे नमुने, पृष्ठभागावरील रासायनिक घटक अशा अनेक गोष्टींची माहिती घेतील. अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर, लेझर किरणं सोडणारा ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप असे विविध पेलोड्स चंद्रावरील पृष्ठभागाचा नव्याने अभ्यास करणार आहेत.

हिंदुस्थानी चांद्रमोहीम जगावेगळी नरेंद्र मोदी 

चांद्रयान-2चे यशस्वी प्रक्षेपण हा आपण हिंदुस्थानवासीयांसाठी मोठय़ा अभिमानाचा आणि गर्वाचा क्षण आहे. मी इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे देशवासीयांच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. आपली चांद्रयान मोहीम ही जगातील अन्य देशांच्या मोहिमेपेक्षा फार वेगळी आहे. कारण नेहमी अंधारात असणाऱया आणि कधीही सूर्यप्रकाश न पडणाऱया चंद्राच्या दक्षिण पोलवर आपले यान उतरणार आहे आणि चंद्राविषयीचे मोठे गूढ शोधून काढण्यात आपले शास्त्रज्ञ यशस्वी ठरणार आहेत याचाच मोठा आनंद आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान मोहिमेचे कौतुक केले आहे.

स्वदेशी तंत्रज्ञान

रोव्हर प्रज्ञान म्हणजे संस्कृत भाषेत ‘बुद्धिमत्ता’. या रोव्हरचं वजन 27 कि.ग्रॅ. आहेत. सहा चाकांचा तो एक रोबोट आहे. पेलोड्स म्हणजे उपग्रह,हायटेक स्पेसक्राफ्ट अथवा परग्रहावर विविध प्रकारचे संशोधन करणारी यंत्रणा असते.

रोव्हर प्रज्ञान

  • 1 कि.मी. प्रतिसेकंद ते 10 कि.मी. प्रतिसेकंद
  • या वेगाने तिरंगा घेऊन फिरतोय
  • 14 दिवसांनी रोव्हर होणार बंद
  • रोव्हर प्रज्ञान चांद्रभूमीवर फिरून तेथील माहिती इस्रोपर्यंत पोहोचवणार आहे.
  • तो तेथे लँडर विक्रमच्या माध्यमातून ही माहिती पाठवेल. त्याचं आयुष्य केवळ चंद्रावरील एका दिवसाइतकं आहे.
  • मात्र चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील 14 दिवसांइतका असतो. त्यामुळे रोव्हर प्रज्ञान सतत 14 दिवस इस्रोला माहिती पाठवणार आहे.
  • तो चांद्रभूमीवर 500 मीटर परिसरात फिरणार आहे. ऑर्बिटर मात्र चंद्राच्या कक्षेत 100 कि.मी. उंचीवरून चंद्राची परिक्रमा करत राहणार आहे. ऑर्बिटर एक वर्षापर्यंत कार्यरत असणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या