चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग सर्वात कठीण,युरोपियन अंतराळ संस्थेचा दावा

1414
Chandrayaan-2 lander Vikram intact, but tilted, near planned landing site

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणे सर्वात कठीण असल्याचा दावा युरोपियन अंतराळ संस्थेने केला आहे. ज्या ठिकाणी विक्रमचे लँडिंग झाले ती जागा अतिशय धोकादायक असल्याचे संस्थेने म्हटले आहे. या मोहिमेची आखणी करताना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यात काय धोके आहेत त्यासंबंधी अहवाल तयार करण्यात आला होता. या ठिकाणी निकाल खूप अनपेक्षित, धोकादायक आणि आश्चर्यकारक असू शकतो, असे युरोपियन अंतराळ संशोधन संस्थेने तयार केलेल्या या अहवालात म्हटले होते.

दक्षिण ध्रुवावर नेमकी काय परिस्थिती

दक्षिण ध्रुवावरील धूळ उपकरणांना चिकटू शकते. त्यामुळे यांत्रिक बिघाड होऊ शकतो. सोलर पॅनलवरही त्याचा परिणाम होईल. त्यामुळे उपकरणांची क्षमताच कमी होईल, असे या अहवालात म्हटले होते. चंद्रावर शेवटचे पाऊल ठेवणाऱ्या युजीन सेर्नान यांनी चंद्रावरील धुळीसंदर्भात भाष्य केले होते. युरोपियन अंतराळ संशोधन संस्थेच्या अहवालात याबाबतचा दाखला देण्यात आला आहे.

युरोपियन संस्थेचे मिशनही झाले होते फेल

‘लुनर लँडर मिशन’ या नावाने आखलेली युरोपियन अंतराळ संशोधन संस्थेची मोहीमही फेल गेली होती. पुरेशा निधीअभावी त्यांनी आपली मोहीमच थांबवली होती. 2018मध्ये हे लँडिंग होणार होते. त्याआधी संस्थेने दक्षिण ध्रुवावरील धोकादायक परिस्थितीबद्दल अहवाल तयार केला होता. येथील वातावरण अतिशय धोकादायक असल्याचे अहवालात म्हटले होते.

सॉफ्ट लँडिंग यशस्वी ठरले असते तर…

सॉफ्ट लँडिंग यशस्वी ठरले असते तर अमेरिका, रशिया, चीननंतर अशी कामगिरी करणारा हिंदुस्थान जगातील चौधा देश ठरला असता. हिंदुस्थानव्यतिरिक्त कुठल्याही देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्याचा प्रयत्न केलेला नाही.

युरोपियन अंतराळ संस्थेच्या अहवालातील या बाबी महत्त्वाच्या

  • लँडिंग दरम्यान सोलर पावर जनरेशनवर परिणाम होणार नाही अशा गोष्टींवर लक्ष असायला हवे.
  • डोंगराळ भागावरही लक्ष असायला हवे. जेणेकरून चांद्रयानाला अडथळा निर्माण होणार नाही.
  • चंद्रावरील धूळ उपकरणांना चिकटण्याचा धोका संभवतो. त्यामुळे उपकरणांमध्ये बिघाड होण्याचा धोका असतो. या बाबींवरही लक्ष असायला हवे.
  • युरोपियन अंतराळ संस्थेच्या अहवालात 17 प्रकारच्या धोक्यांबाबत सांगण्यात आले आहे.
  • युरोपियन संस्था, युनिवर्सिटी ऑफ प्योंटो रिको-मयागेज यांनी नासासोबत मिळून हा अहवाल तयार केला होता.
  • 2024मध्ये चंद्रावर माणूस पाठवण्याच्या उद्देशाने अहवाल तयार करण्यात आला होता.

युरोपियन अंतराळ संशोधन संस्था आता कॅनडा आणि जपानच्या अंतराळ संसोधन संस्थेसोबत मिळून हेरॅकल्स रोबोटिक मिशनवर काम करत आहे. 2020मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंगची ही मोहीम आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या