#Chandrayaan-2 विक्रम लँडरचे काय झालं… केंद्र सरकारने संसदेत दिली ‘ही’ माहिती

2037

हिंदुस्थानच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असणाऱ्या चांद्रयान-2 या मोहीमेबाबत केंद्र सरकारने बुधवारी संसदेमध्ये माहिती दिली. वैज्ञानिकांनी ठरवलेल्या मानकांप्रमाणे (पॅरामिटर) वेग नियंत्रीत होऊ न शकल्याने विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हरचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाले. चंद्राच्या कक्षेमध्ये प्रवेश केल्यानंतर 500 मीटर अंतरावर असताना विक्रम लँडरचे हार्ड लँडिंग झाले, असे केंद्र सरकारने सांगितले.

हिंदुस्थानच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असणाऱ्या ‘चांद्रयान-2’ मोहीमेला विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग होऊ न शकल्याने धक्का बसला. 7 सप्टेंबरला विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते. परंतु इस्त्रोला विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आले. तेव्हापासून अद्याप विक्रम लँडरचा पत्ता लागलेला नाही. नासा आणि इस्त्रो संयुक्तपणे विक्रम लँडरचा शोध घेत असतानाही ते नक्की कोणत्या अवस्थेत आणि चंद्राच्या कोणत्या भागात आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही.

याच संदर्भात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी एका प्रश्नाला लिखित स्वरुपात उत्तर दिले. ‘7 सप्टेंबरला विक्रम लँडरच्या लँडिग दिवशी चंद्रापासून 30 किलोमीटर ते 7.4 किलोमीटरपर्यंतचा प्रवास सुरळीत होता. यावेळी विक्रम लँडरचा वेग 1683 मीटर प्रतिसेकंदावरून 146 मीटर प्रति सेकंदावर आला होता. परंतु येथून पुढे दुसऱ्या चरणामध्ये विक्रम लँडरचा वेग नियोजित वेगापेक्षा जास्त होता. त्यामुळे विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग होऊ शकले नाही. चंद्रापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर असताना विक्रम लँडरचे हार्ड लँडिंग झाले, असे सिंह यांनी सांगितले.

moon-vikram

ही गोष्ट सोडल्यास चांद्रयान-2 चे प्रक्षेपण, लँडरपासून ऑर्बिटर वेगळे होणे, ऑर्बिटरचे कक्षेमधील भ्रमण, आणि डी बूस्टिंग यासारख्या गोष्टींमध्ये आपल्याला यश मिळाले. चंद्राच्या कक्षेमध्ये सध्या ऑर्बिटर व्यवस्थित काम करत आहे. पुढील 7 वर्ष ऑर्बिटर सुस्थितीत असणार असून फोटोसह अन्य माहितीही इस्त्रोकडे पाठवत आहे, असेही सिंह यांनी संसदेत दिलेल्या लिखित उत्तरात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या