‘विक्रम’शी संपर्काच्या आशा वाढल्या; इस्त्रो, नासासह ‘ही’ संस्थाही मैदानात

2845
फोटो - रॉयटर्स

हिंदुस्थानच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असणाऱ्या ‘चांद्रयान-2’ च्या (chandrayaan 2 ) विक्रम लॅण्डरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्त्रो’ (ISRO) आणि अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ (NASA) करत आहे. यात अद्याप यश आलेले नाही. मात्र हिंदुस्थानमधील आणखी एक संस्था विक्रमच्या संपर्कासाठी पुढे सरसावली आहे. भाभा अटॉमिक रिसर्च सेंटरने विक्रमशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याने संशोधकांसह देशवासियांच्या आशा उंचावल्या आहेत.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, बार्क आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने संयुक्तपणे एक खास अँटिना तयार केला आहे. हा अँटिना एका टेनिस कोर्टपेक्षा पाच पट मोठा असून याला बनवण्यासाठी 65 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या खास अँटिनाद्वारे विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. अँटिनाद्वारे विक्रमला सिग्नल पाठवण्यात येत आहेत. दरम्यान, नोबेल पुरस्कार विजेते सर्जे हरोशे यांही विक्रमशी लवकरच संपर्क साधला जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

इस्त्रोकडून प्रयत्न सुरुच
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यापासून अवघ्या 2.1 किलोमीटरवर असताना विक्रम लॅण्डरचा संपर्क तुटला होता. तेव्हापासून सातत्याने इस्त्रो विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आठ दिवस उलटून गेले तरी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. याबाबत बोलताना इस्त्रोचे अधिकारी म्हणाले की, विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरुच आहेत. 20 ते 21 सप्टेंबरपर्यंत हे प्रयत्न सुरु राहतील. विक्रम ज्या भागात आहे तिथे जोपर्यंत सूर्याचा प्रकाश आहे तोपर्यंत आमचे प्रयत्न सुरुच राहणार आहेत.

विक्रम कलंडलेल्या अवस्थेत
चांद्रयान-2 योजनेत सहभागी असणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटरने विक्रमला आपला कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहे. विक्रम लॅण्डर सुस्थितीत असून चंद्रावर कलंडलेल्या अवस्थेत आहे. विक्रम आपल्या चार पायांवर उभा नाही, परंतु त्याचे तुकडे झालेले नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या