Chandrayaan-2 ‘विक्रम’च्या संपर्कासाठी पुढील 24 तास महत्त्वाचे, ‘LRO’वर सर्वांची नजर

3431

इस्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पडलेला लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संपर्क करण्याचे इस्त्रोकडून (Indian Space Research Organisation – ISRO) सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. इस्त्रोच्या मदतीसाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ (NASA) आणि हिंदुस्थानची भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर ही संस्था पुढे सरसावली आहे. विक्रमशी संपर्क साधण्यासाठी पुढील 24 अति महत्त्वाचे असणार आहेत.

चांद्रयान-2 चे ऑर्बिटर विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. यासह नासाचे लूनर रिकॉनसेंस ऑर्बिटरही (LRO) लॅण्डरला मेसेज पाठवत आहे. लूनर रिकॉनसेंस ऑर्बिटर विक्रम लॅण्डर ज्या भागात आहे तेथील फोटो पाठवत आहे. तसेच 17 सप्टेंबर म्हणजेच मंगळवारी नासाचे हे ऑर्बिटर विक्रम लॅण्डर जिथे पडले आहे त्या भागावरून जाणार आहे. या काळामध्ये विक्रमशी संपर्क होण्याच्या शक्यता अधिक आहेत.

‘आज तक’शी बोलताना नासाच्या लूनर रिकॉनसेंस ऑर्बिटर (LRO) प्रोजेक्टचे संशोधक नोआ. ई. पेत्रो म्हणाले की, चंद्रावर आता अंधार (सायंकाळ) होऊ लागला आहे. आमचे LRO विक्रम लॅण्डरचे फोटो घेईल, मात्र ते किती स्पष्ट येतील हे माहिती नाही. कारण सायंकाळी सूर्याचा प्रकाश कमी होतो, त्यामुळे चंद्रावरील वस्तूंचा फोटो घेणे आव्हानात्क आहे. परंतु जे काही फोटो येतील ते आम्ही इस्त्रोसोबत शेअर करू, असेही ते म्हणाले.

‘नासा’वर सर्वांची नजर
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ (NASA) आपल्या डीप स्पेस नेटवर्कच्या तीन सेंटर्सद्वारे सातत्याने चांद्रयान-2 च्या ऑर्बिटर आणि लॅण्डरची संपर्क साधत आहे. स्पेनच्या माद्रित, अमेरिकेच्या कॅलिफोर्मियातील गोल्डस्टोन आणि ऑस्ट्रेलियाच्या कॅनबरा भागात हे तीन सेंटर्स आहेत. यांच्याकडून पाठवलेल्या संदेशांना ऑर्बिटरकडून उत्तर मिळत आहे, मात्र विक्रमकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या