पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेले चंदू चव्हाण पुन्हा देशसेवेसाठी तयार

41

सामना ऑनलाईन। धुळे

देशसेवेसाठी मी नेहमीच तयार असून लवकरच सेवेत पुन्हा रुजू होईन अशी प्रतिक्रिया पाकिस्तानच्या तावडीतून सुखरुप सुटका झालेले जवान चंदू चव्हाण यांनी दिली आहे. पाच राज्यातील निकालांमुळे आपल्या मूळ गावी परतलेल्या चंदू चव्हाण यांची बातमी काहीशी झाकोळली गेली होती. चव्हाण त्यांचे मूळ गाव असलेल्या धुळे तालुक्यातील बोरविहीर इथे परतल्यानंतर त्यांनी आपण पुन्हा देशसेवेसाठी सज्ज झाल्याचे सांगितले.

हिंदुस्थानचे जवान चंदू चव्हाण हे सर्जिकल स्ट्राईकनंतर चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेले होते. पाकड्यांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांचे अत्यंत हाल केले. हिंदुस्थानच्या मुत्सद्देगिरीमुळे आणि केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या तत्परतेमुळे चंदू चव्हाण मायदेशी परतले. पाकड्यांनी त्यांना ज्या यातना दिल्या त्या ऐकताना अजूनही अंगावर काटा येतो. चंदू चव्हाण जेव्हा त्यांच्या मूळ गावी परतले तेव्हा त्यांच्यासोबत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

चंदू चव्हाण जेव्हा त्यांच्या मूळगावी परतले तेव्हा बोरविहीर गावच्या रहिवाशांनी जबरदस्त जल्लोष केला, गावातील महिलांनी चव्हाण यांचे औक्षण करत त्यांचे स्वागत केले. ग्रामस्थांनी केलेल्या जंगी स्वागताने चंदू चव्हाण भारावून गेले होते.

आपली प्रतिक्रिया द्या