कामगार कल्याण भवनातील मनमानी कंत्राटदार बदला!

सामना ऑनलाईन, मुंबई

कन्नमवार नगरमधील कामगार कल्याण मंडळाच्या प्रशस्त अशा कामगार कल्याण भवनात अनेक सोयी सुविधांचा अभाव आहे. कंत्राटदाराचा मनमानी कारभार आणि अवाच्या सवा पद्धतीने सुरू असलेल्या भाडेआकारणीमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे मनमानी कंत्राटदारांची बदली करून स्थानिक कंत्राटदार नेमण्याची आणि कामगार भवनात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

कंत्राटदारांच्या मोनोपॉलीमुळे कामगार कल्याण भवनामध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. हॉल आरक्षित करण्यासाठी गोरेगावला जावे लागते. त्यातच कंत्राटदार स्थानिकांना प्राधान्य न देता जादा रक्कम घेऊन हॉल भाडय़ाने देत आहेत. यासंदर्भात आमदार सुनील राऊत यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सुनील राऊत आणि कामगार आयुक्त सतीश दाभाडे यांनी आज कामगार कल्याण भवनातील व्यायामशाळा, पाळणाघर, अभ्यासिका, शिवणक्लासरूम आणि नाटय़गृहाची पाहणी केली. यावेळी उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव, नगरसेवक उपेंद्र सावंत, उपविभाग संघटिका रश्मी पौडकर, शाखा संघटिका वंदना बेंद्रे, शाखाप्रमुख शंकर धमाले, अभय राणे उपस्थित होते.

व्यायामशाळेत नवीन व्यायामाचे साहित्य, एसी, एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांकरिता वाय फाय, नाटय़गृहात आसनव्यवस्था, एसी, अत्याधुनिक साऊंड, कामगार कल्याण भवनाची रंगरंगोटी अशा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी केली. या सर्व मागण्या मान्य करत दोन महिन्यात या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी कामगार आयुक्तांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या