प्रत्येक गुणवत्ता यादीसाठी कॉलेज पर्याय बदलता येणार

15

सामना ऑनलाईन,मुंबई

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या गुणवत्ता यादीसाठी प्रत्येकवेळी विद्यार्थ्यांना कॉलेजचे पर्याय बदलण्याची संधी मिळणार आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशात यंदा अनेक बदल करण्यात आले आहेत. नियमानुसार अकरावीच्या चार गुणवत्ता याद्या जाहीर होणार असून विद्यार्थ्याने दिलेल्या कॉलेज पर्यायानुसार पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळाला नाही तर पुढील गुणवत्ता यादीवेळी विद्यार्थ्याला ऑनलाइन अर्जातील कॉलेजचे पर्याय बदलता येणार आहेत.

अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणाऱया विद्यार्थ्यांना यंदा आर्टस्, कॉमर्स, सायन्स यांपैकी कोणत्याही एका शाखेसाठीच अर्ज करता येणार आहे. याशिवाय ३५ कॉलेजचे पर्याय भरण्याची कटकटही यंदा नसणार आहे. विद्यार्थ्यांना कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दहा कॉलेजचे पर्याय ऑनलाइन अर्जात भरायचे आहेत. एखाद्या विद्यार्थ्याने फक्त तीनच कॉलेजचे पर्याय दिले असतील आणि त्याला पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळाला नाही तर तो विद्यार्थी दुसऱया गुणवत्ता यादीसाठी कॉलेज पर्यायात बदल करू शकतो.  कॉलेजचे पर्याय बदलण्याची विद्यार्थ्यांवर सक्ती नसून पर्याय न बदलल्यास आधीचे पर्याय कायम राहणार आहेत.

यूटय़ूबवर पहा ऑनलाइन अर्ज भरण्याची पद्धत

अकरावी ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणाऱया अडचणी दूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने यूटय़ूबची निवड केली आहे. ऑनलाइन अर्ज कसा भरावा, कॉलेज पसंतीक्रम कसे निवडावे, कला आणि क्रीडा कोटय़ाविषयीची माहिती, आरक्षण याची सर्व ऑडीओ-व्हिडीओ माहिती  यूटय़ूबवर उपलब्ध आहे. अर्ज भरताना काही अडचण येत असल्यास शिवाय शंकांचे निरसन न झाल्यास विद्यार्थी आणि पालक यूटय़ूबवर जाऊन शंका दूर करू शकतात. त्यासाठी इथे क्लिक करा

आपली प्रतिक्रिया द्या