दुर्गा पूजेची वेळ बदलणार नाही, मोहरमच्या ताबूतची बदला- योगी आदित्यनाथ

सामना ऑनलाईन । लखनौ

गेल्या वर्षी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोहरमच्या ताबूतसाठी दुर्गा विसर्जनाचा दिवस बदलला होता. त्यावरून त्यांच्यावर देशभरातून टीका झाली होती. त्याचाच संदर्भ देत आज योगी आदित्यनाथांनी देखील त्यांना चांगलेच सुनावले आहे. पश्चिम बंगालमधील बरासत येथील सभेत त्यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली आहे.

‘संपूर्ण देशात दुर्गा पूजा आणि मोहरम हे एकाच दिवशी असतात. उत्तर प्रदेशमध्ये एका अधिकाऱ्याने मला विचारले की दुर्गा पूजाची वेळ बदलायची का? मी त्याला सांगितले की दुर्गा पूजेचा वेळ बदलणार नाही. तुम्हाला वेळ बदलायची असेल तर मोहरमच्या ताबूतची वेळ बदला’, असा टोला त्यांनी ममता बॅनर्जींना लगावला आहे.

दरम्यान, भाजप व तृणमूल काँग्रेसमधील वाद वाढत चाललाआहे. आज कोलकाताच्या फूल बागान भागामध्ये होणारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा अखेरच्या क्षणी रद्द करण्यात आली आहे. त्यावरून देखील योगींनी ट्वीट करत ममता बॅनर्जींवर टीका केली आहे.