मानसिकता कधी बदलणार?

253

>>शुभांगी बागडे<<

विविध घटनांमुळे महिलांविषयी असणारं असुरक्षिततेचं वातावरण देशभरात तयार झालं आहे. यात नवीन काहीच नसलं तरी गेल्या काही दिवसांत हुंडा, लग्नाचा खर्च, त्याविषयीची मानसिकता आणि परिणामस्तव घडणाऱया आत्महत्या या घटनांनी डोके वर काढले आहे. हुंडाबळीची समस्या नवीन नाहीच. मुलीच्या लग्नासाठी हुंडा देण्याची ऐपत नसल्याने होणाऱ्या शेतकऱयाच्या, गरीब बापाच्या आत्महत्यांनी मुलींकडे लक्ष वळवले आहे. शीतल वायळ हे त्याचंच एक रूप आहे. शेतकरी बापावरचं ओझं कमी व्हावं म्हणून शीतलने जीव दिला. शीतल काही पहिलीच नाही. त्याच गावातील मोहिनी पांडुरंग भिसे या शेतकरी कन्येनेही याच कारणामुळे जीवनयात्रा संपवली. कर्जबाजारी शेतकऱयांच्या हालाखीची जाणीव, हुंडय़ाचं, लग्नखर्चाचं ओझं आणि त्यातून होणारी ही ओढाताण असह्य आहे.

आपल्या गावातील दोन मुलींचा हुंडाबळी झाल्यानंतर आता वाघोली भिसे गाव ना हुंडा घेऊ ना देऊ या मान्यतेने एकत्र आले आहे. हुंडा हा विषय एका विशिष्ट जातीधर्मापुरता असा मर्यादित नाही, तर तो सर्व समावेशक आहे. शीतल कायाळ या मुलीने आपल्या वडिलांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेत, हतबल होत आत्महत्या केली, पण जाता जाता ती बोलली. शीतलने समाजातल्या या मानसिकेतवर आसुड ओढले. आजवर अगदी दर तासाला ज्या लाखो शीतलला हुंडय़ापायी, पैशाच्या हव्यासापायी निर्दयीपणे मारून टाकले त्यांचे काय? समाजात रुजलेल्या या वाईट प्रथेला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी समाजप्रबोधन करण्याची खरी गरज आहे.

राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड संस्थेच्या आकडेवारीनुसार मागील वर्षातील विविध राज्यांत सुमारे आठ हजारांपेक्षा  विवाहितांचा हुंडय़ासाठी बळी गेल्याची नोंद आहे. त्यात महाराष्ट्रातील हुंडाबळी जास्त आहेत. जालना, मराठवाडा, बुलढाणा येथे हुंडाबळींची सर्वाधिक नोंद आहे. हुंडाबळींची ही वाढती संख्या पाहता हुंडय़ाला होणारा विरोध कमकुवत असल्याचंच दिसून येतं. हुंडय़ासाठी सुनेला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. केवळ ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातही या प्रकारात काढ होत असल्याचे चित्र आहे. हुंडाबळी रोखण्यासाठी समाजात जागरूकता निर्माण होणे महत्त्वाचे आहे. लग्नासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च करण्याचे टाळणे गरजेचे आहे. सध्या सर्वात मोठा आणि महागडा घरगुती इव्हेंट म्हणजे लग्न समारंभ मानला जातो. वधूसाठी खरेदी केल्या जाणाऱया महागडय़ा साडय़ा, लग्नमंडपाची सजावट आदींसाठी केला जाणारा खर्च हासुद्धा हुंडाच आहे असे म्हणायला हवे. १९६१च्या हुंडाविरोधी कायद्यानुसार हुंडा देण्याची विनंती करणे, तो घेणे किंवा देणे कायद्याने गुन्हा आहे. लग्नातील खर्चाचा मोबदला किंवा त्याबदल्यात भेटवस्तू हुंडा म्हणून देण्याची पद्धत रूढ आहे. हुंडाविरोधी कायद्यात १९८३ मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या असल्या तरी त्यात अनेक पळवाटाही आहेत. म्हणूनच हुंडाविरोधी आता तरुणींनीच पुढाकार घेऊन बंड केले पाहिजे.

कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार निवारण कायदा २००५ च्या व्याख्येत कोणत्याही वयोगटातल्या महिलेचा तिच्या सासरच्या मंडळींकडून मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास होत असेल तर तो गुन्हाच मानला जातो. विवाहानंतर अनेक मुलींना हुंडय़ाकरिता होणारा छळ हा थेट न होता वेगळ्या मार्गाने होतो. मुलींवर अधिकार गाजवणं, वडीलांकडून पैशांची मागणी करणं, मुलगाच व्हायला हवा याचा अट्टाहास धरणं अशा अनेक प्रकारे तिच्याकर दबाव आणला जातो. हिंदुस्थानात हुंडय़ासाठी जाच होऊन त्यात मुलींचा घातपाताने मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. याचे मूळ कारणही लिंगभेदातच आहे. कौटुंबिक हिंसाचार कायदा अस्तित्वात आल्यानंतर कायदे महिलांच्या बाजूने आहेत अशी ओरड झाली पण हुंडाबळीची दाहकता कमी न होता ती वाढतच गेली. सध्या सगळीकडे विशिष्ट समाजच हुंडाबळीला कारणीभूत आहे असे एकतर्फी चित्रण केले जात आहे. मात्र सगळीकडे एकदंर सारखीच स्थिती आहे. कोणत्या समाजात हे घडत नाही का घडले नाही असे नाही. कन्यादान पद्धतीचे पालन परंपरागत करणारे आपण मुलीच्या सुखासाठी तिच्या जन्मापासून झटतो. मुलीसाठी करण्यात येणारी गुंतवणूक, मग ती पैशाची असो का सोन्याची सहजपणे तिच्या लग्नासाठीची तरतूद मानतो. मुलासाठीची गुंतवणूक ही त्याच्या शिक्षणासाठी, भवितव्यासाठी केली आहे असे आजही मानले जाते. ही मानसिकता तत्काळ बदलली तरच मुलींचं भविष्य उज्वल असल्याची आपण खात्री देऊ शकू. हुंडा प्रथेचा प्रश्न मोडीत काढायचा तर फक्त हुंडा देणार नाही आणि घेणार नाही का आम्ही हुंडा घेतला नाही, अशा शपथा घेऊन हा प्रश्न कधीच संपणार नाही. कोणत्याही लग्नातला बडेजावपणा, दुसऱयाला कमी लेखण्याची कृत्ती, सर्व काही पैशांतच तोलता येते हा हव्यास आणि आपली किंमत लावण्याची, हुंडय़ाच्या माध्यमातून ती वसूल करण्याची परंपरा मानणाऱया कृत्तीची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे तरुणांनी पुढे येत हुंडा घेण्याच्या प्रथेला विरोध केला पाहिजे.

हुंडय़ापायी, लग्नखर्चापायी आपला जीव संपवणाऱया मुलींचे आक्रोश थांबवण्याकरिता आता समाजातल्या प्रत्येक घटकाने एकत्र आलेच पाहिजे. खास करून तरुण-तरुणींनी ही प्रथा मुळातून उखडण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेच पाहिजे.

लिंगभेदाचे सावट नष्ट व्हायला हवे

हिंदुस्थानात दरकर्षी १२ ते १५ हजार किकाहित मुली हुंडा प्रथेच्या बळी ठरतात. हुंडाबळीचे सर्वाधिक प्रमाण उत्तर हिंदुस्थान, हरयाणा, महाराष्ट्र, राजस्थान या राज्यांत आढळते. अनेक पालकांना हुंडा देण्याकरिता कर्जबाजारी व्हावे लागते. घर, शेती गहाण टाकावी लागते. हुंडय़ाच्या दडपणामुळे मुलींचा शारीरिक, मानसिक विकास खुंटतो. आपल्यामुळे घरच्यांना त्रास होतो या जाणिवेने अनेक मुली एकतर घरातून निघून जातात अथवा आत्महत्या करणे पसंत करतात. आईकडील ज्याच्याशी ठरवतील त्याच्याशी लग्न करण्याची त्यांची मानसिकता तयार होते. शहरीपेक्षा ग्रामीण भागातले हे शोषण गंभीर असले तरी शहरी भागातही कौटुंबिक, मानसिक हिंसाचाराचे प्रमाण अधिक आहे. एक व्यक्ती म्हणून समानतेच्या मार्गाने स्त्रीचा कधी आदर केला जाणार आहे. संस्कृतीतील अशी कोणती मूल्यं अजूनही समाजावर पगडा टाकून आहेत ज्यात स्त्रीचा आदर करू नका असं शिकवलं जातं. या रीतीभाती, आदर्शांचं अवडंबर केवळ स्त्रीच्या प्रत्येक हक्कांपाशी घुटमळत आहे. मुळात एक व्यक्ती म्हणून तिचा स्वीकार होत नाहीये आणि येणाऱया काळात हेच समाजासाठी घातक ठरेल हे नक्की. यासाठी लिंगभेदाचं सावट मुळापासून झटकून टाकलं पाहिजे.

 वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या

आपली प्रतिक्रिया द्या