कामाच्या वेळेत बदल; नायर रुग्णालयातील परिचारिकांमध्ये संताप, उद्यापासून तीव्र आंदोलनाचा इशारा

परिचारिकांच्या अपुऱ्या संख्येमुळे इतर परिचारिकांवर येणारा कामाचा अतिरिक्त ताण, त्यातच आगाऊ सूचना न देता रुग्णालयाच्या प्रशासनाने कामाच्या वेळेत अचानक केलेला बदल यामुळे नायर रुग्णालयातील परिचारिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. रविवारपर्यंत रुग्णालय प्रशासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास सोमवार, 17 जूनपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दि म्युनिसिपल युनियनने दिला आहे.

  परिचारिका संवर्गाचे अनेक प्रश्न ‘इंडियन नर्सिंग कौन्सिल’च्या नियमाप्रमाणे आणि रुग्ण व परिचारिकांचे निकष लागू करणे, परिचारिका संवर्गाची रिक्त पदे भरणे, महिला नाभिकाचे पद निर्माण करणे, परिचारिका शिक्षक संवर्गाची रिक्त पदे भरणे असे अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यात नायर रुग्णालय प्रशासन चालढकल करत आहे. त्यात आता कामाच्या वेळेत अचानक बदल केल्याने परिचारिकांमध्ये संताप आहे. परिचारिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भेटीची वेळ द्यावी. तसेच चर्चा करून निर्णय होईपर्यंत दिलेल्या आदेशास स्थगिती द्यावी, अशी विनंती दि म्युनिसिपल युनियनच्या माध्यमातून रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे.

नायर रुग्णालय प्रशासनाने परिचारिकांच्या प्रश्नांबाबत आजपर्यंत सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे 16 जूनपर्यंत निर्णय न झाल्यास सर्व परिचारिका 17 जूनपासून आंदोलन करतील आणि या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची असेल.

– रमाकांत बने, सरचिटणीस, दि म्युनिसिपल युनियन