नोटांचा आकार, रंग बदलण्याचे कारण काय? हायकोर्टाची आरबीआयला विचारणा

671

नोटांचे आकार, रंग आणि त्याची वैशिष्टय़ वारंवार बदलणाऱया आरबीआयला मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलेच फटकारले. अनेकदा असे दिसून आले आहे की आरबीआय नोटा तसेच नाणी यामध्ये बदल करते, पण हे बदल अयोग्य असतात. या बदलांमुळे विशेषतः दृष्टीहीन नागरिकांना या नोटा आणि नाणी ओळखताना अडचणी येतात. त्यामुळे या नोटांचा आकार, रंग वारंवार बदलण्याचे कारण काय, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने आरबीआयला केली.

चलनातील नव्या नोटा तसेच नाणे ओळखणे कठीण जात असल्याने नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड या संस्थेच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. नवीन नोटा व नाणी ओळखता यावे यासाठीनोटांवर संकेत अथवा चिन्हे वापरण्याचे हायकोर्टाने आरबीआयला आदेश द्यावेत अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. गेल्या सुनावणीवेळी हायकोर्टाने या नोटांचा आकार रंग का बदलला त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश आरबीआयला दिले होते परंतु आज पार पडलेल्या सुनावणीवेळी आरबीआयने त्यासाठी वेळ मागितल्याने हायकोर्टने नाराजी व्यक्त करत आरबीआयला झापले व दोन आठवडय़ाकरिता सुनावणी तहकूब केली.

न्यायालय काय म्हणाले

> एखादी नोट अथवा नाणी ओळखण्यासाठी दृष्टीहिनांना वर्षभराचा कालावधी लागतो एकदा का नोट ओळखता आली की आरबीआय त्यात लगेच बदल करते.

> नोटांमध्ये बदल करण्याबाबत आरबीआयला अधिकार असले तरी याचा अर्थ असा होत नाही की कोणतीही पूर्वसूचना न देता त्यात बदल केला पाहिजे

> आम्हाला याप्रकरणी कोणताही डेटा नकोय पण नोटांमध्ये वारंवार बदल करण्याचे कारण काय

> फेक करन्सीचे कारण देत नोटा बदलल्या जातात परंतु नोटबंदी झाल्यानंतर मिळालेल्या माहितीतून काहीच फलित निघत नाही

> या प्रकरणाकडे डोळेझाक करू नका

आपली प्रतिक्रिया द्या