चित्रपट महामंडळाच्या सभेत प्रचंड गदारोळ

453

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची सर्वसाधारण सभा रविवारी अभूतपूर्व गोंधळ आणि तणावपूर्ण वातावरणात पार पडली. संचालकांच्या अंगावर कागद फेकण्यापासून ते अध्यक्षांसमोर माजी उपाध्यक्षकांकडून जमिनीवर आडवे पडून वाट रोखण्यापर्यंत घोषणाबाजीने ही सभा गाजली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक मंदिर येथे घेण्यात आलेल्या या सभेसाठी मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांसह राज्याच्या कानाकोपऱयातून महामंडळाचे अनेक सभासद उपस्थित होते. उशिरानेच ही सभा सुरू झाली. सभेच्या सुरुवातीपासून विरोधी गट आक्रमक झाला. एका प्रकरणाची तक्रार मागे घेण्याचा विषय चर्चेला घेण्याचा आग्रह धरला, मात्र विषयपत्रिकेनंतरच यावर चर्चा करण्याची भूमिका सत्ताधारी गटाने घेतली. पदाधिकाऱयांकडून विषयाला बगल देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करीत विरोधी गटाकडून गोंधळास सुरुवात झाली.

माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यावर एका अभिनेत्रीने दाखल केलेल्या विनयभंगाच्या गुन्हय़ाप्रकरणी संबंधित अभिनेत्रीचे सभासदत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी करीत दोन्ही बाजूने प्रचंड गोंधळ झाला. महामंडळाचे कायदा सल्लागार ऍड. प्रशांत पाटील यांनी हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने तो विषय घेता येणार नसल्याचे सांगितले. यावर सभासदांनी न्यायप्रविष्ट बाब असताना सभासदत्व दिलेच कसे अशी विचारणा करीत थेट वकीलच बदलण्याची मागणी केली. सत्ताधारी गटाकडून यावर नेमके उत्तर दिले नाही. त्यामुळे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी अध्यक्ष व अभिनेते विजय पाटकर यांच्यासह विरोधकांनी या सभेत केली.

दरम्यान, गोंधळातच अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी विषयपत्रिकेनुसार सभेची सुरुवात केली. अध्यक्षीय प्रास्ताविक भाषणात त्यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा व भविष्यातील नियोजन सभासदांसमोर मांडले.

आपली प्रतिक्रिया द्या