
अभिनेते चार्ली चॅप्लिन यांचं नाव माहीत नाही, असा चित्रपटप्रेमी विरळाच. खळखळून हसायला लावणारा आणि नकळत प्रेक्षकांचे डोळे ओलावणारा मूकाभिनय ही चार्ली यांची खासियत. विलक्षण अभिनय सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी अनेक पिढ्यांच्या मनावर राज्य केलं.
अशा या विख्यात अभिनेत्याची भुरळ नवख्यांपासून ते अभिनयात मुरलेल्या अनेकांना अनेकदा पडली आहे. अनेक कलाकारांनी आपल्या कलाकृती त्यांना समर्पित केल्या आहेत. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे एका बॉलिवूड अभिनेत्यानेही चार्ली यांना एक मानवंदना दिली आहे. त्याने एक फोटो शेअर केला असून त्यात तो हुबेहुब चार्ली चॅप्लिन यांच्यासारखा दिसत आहे.
चार्ली यांच्या रुपात असलेल्या अभिनेत्याला ओळखताही येणार नाही, इतकं तो वेगळा दिसत आहे. हा अभिनेता म्हणजे दुसरा तिसरा कुणीही नसून विकी कौशल आहे. विकी स्वतः एक उत्तम अभिनेता आहे. मसान, राझी, संजू, उरी अशा वेगवेगळ्या चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. त्याच्या या अनोख्या मानवंदनेला नेटकऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.