चटणी

51609

स्वप्नाली पालकर, आहारतज्ञ

सध्या दिवाळीचा राहिलेला फराह संपवणं सुरू आहे. पंचपक्वान्नांनी भरलेल्या ताटाची रंगत वाढवते चटणी. ही चटणी जेवढी तोंडाला चव आणते तितकीच ती आरोग्यदायीही असते.

हिंदुस्थानी पारंपरिक जेवणात चटणी या पदार्थाला अनन्यसाधारण महत्व आहे. ताटात डाव्या बाजूच्या पदार्थांमध्ये चटण्या, कोशिंबिरी वाढल्या जातात. चटण्यांमुळे जेवण रंगतदार तर होतेच त्याबरोबर चविष्टपण होते. नावीन्यपूर्ण होते. प्रत्येकाची चटण्या बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. साधारण चटण्या या दोन प्रकारात बनवल्या जातात, सुकी चटणी आणि ओली चटणी. सुक्या चटण्या ह्या पंधरा दिवस, एक महिना पण टिकतात. तर ओल्या चटण्या एक-दोन दिवसांत संपवाव्या लागतात. सुक्या चटण्यांसाठी साधारणपणे तीळ, शेंगदाणा, जवस, कारळे, सुके खोबरे इत्यादींचा वापर केला जातो. जेवणाच्या ताटात आपण या गोष्टी चमचा, दोन चमचे खातो. त्यातून जीवनसत्व ई आणि पोटॅशिअम मिळते. चटण्यांमध्ये खूप प्रमाणात खनिजे असतात. कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, झिंक असतात तसेच ‘ब’जीवनसत्वे मिळत असतात. प्रोटिन मिळतात.

कारळ्याची चटणी

कारळ्याची चटणी आणि ज्वारीची भाकरी ज्यांच्या आहारात आहे, त्यांना मलावरोध, मूळव्याध, मूतखडा, मूत्रकृच्छ किंवा लघवीची आग या विकारांत पथ्यपाण्याची फिकीर करावयास नको. कारळे नुसते स्निग्ध नसून पौष्टिक व त्याचबरोबर वातशमन करणारे आहेत. लघवी, मलप्रवृत्ती, आर्तवप्रवृत्ती यांचे योग्य वेळी, योग्य प्रमाणात अनुमोलन कारळ्याची चटणी करील. कारळ्याची चटणी खूप तिखट करू नये. सोबत कुटलेले तीळ दिल्यास पौष्टिक अंश वाढतो. कारळे व तीळ यांची एकत्र चटणी बाळंतिणीचे दूध वाढवायला मदत करते. कारळ्याचे तेल तीळ तेलाच्या अपेक्षेत अधिक कृमीनाशक व उष्ण आहे.

करवंद चटणी

करवंदाची चटणीचा जेवणात समावेश केल्यास रक्तप्रवाह नियंत्रणात राहतो, किडनीसाठी उत्तम आहे, ऑनिमिया, ऍण्टीफंगल, रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आदी फायदा होतो.

लसूण चटणी

लसूण चटणी खाल्ल्याने ऍण्टीऑक्सिडेण्ट, रक्त पातळ करण्यास मदत होते, कोलेस्टोरोल कमी करते.

जवसाची चटणी

जवसाची चटणी आणि त्यासोबत भाकरी…चव अप्रतिमच. जवस अतिशय पौष्टिक आहे. त्यात ओमेगा थ्री फॅटी ऑसिड आहेत. हृदयाच्या आणि मेंदूच्या आरोग्यासाठी ही फॅटी ऑसिड अत्यावश्यक असतात आणि  एकूणत शरीराच्या निरोगीपणासाठी याचे योगदान आहे. पण जवस नुसते खाण्यापेक्षा चटणीच्या रूपाने आहारात समावेश करणे गुणकारी आहे.तसेच कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करते. हृदयरोग आणि कर्करोग यापासून संरक्षण होतेय.

शेंगदाणे-लसूण चटणी

शेंगदाण्याची कोरडी चटणी एकदम सोपी, सर्वाना आवडणारी आहे. मुलांना डब्यात पोळीला तूप लावून त्यावर चटणी पसरून रोल करून देता येते. तसेच आयत्यावेळी पाहुणे आल्यास ताटात डाव्या बाजूला वाढता येते. रोजच्या जेवणात दही घालून खाता येते. घाईच्यावेळी एखाद्या रस्साभाजीमधे चमचाभर टाकली असता रस्सा दाट व चवदार होतो. अशा अनेक प्रकारांनी उपयोगी येणारी चटणी कशी केली पहा.

कढीपत्त्याची चटणी

कढीपत्त्याची चटणी आरोग्यासाठी गुणकारी आहे. कढीपत्त्यामध्ये ‘अ’ जीवनसत्व आहे. तसेच त्यात फायबर जास्त आहेत. तो डोळ्यांकरिता जास्त गुणकारी आहे. जेवणात घातल्यावर रूचकर आणि गुणकारी असतो. त्यामध्ये बऱयाच प्रमाणात ऍण्टीऑक्सिडेण्ट असतात. तसेच याच्या सेवनाने डायरिया, जठरासंबंधीचे विकार, अपचन, पाचक क्रण,जुलाब, मधुमेह, कर्करोगाला प्रतिंबध घालणारे गुणधर्म, केसांच्या आरोग्यासाठी, त्वचेच्या सौंदर्यासाठी गुणकारी आहेत. कढीपत्त्याची तयार कोरडी चटणी हवाबंद बाटलीमध्ये भरून ठेवावी. बरेच दिवस छान टिकते. पोळी सोबत किंवा डोशावर पसरून खायला चवदार लागते.

आपली प्रतिक्रिया द्या