बुलढाण्याच्या ‘या’ हॉटेलमध्ये रोज होते छत्रपती शिवरायांची आरती

राजेश देशमाने । बुलढाणा

प्रखर योद्धा, कुशल राज्यकर्ता, उदार, प्रजाहितदक्ष, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची बुलढाण्याच्या एका हॉटेलमध्ये रोज आरती आणि पूजन होते. छत्रपतींचे विचार व कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबवत असतानाच राजेश हेलगे या व्यक्तीने स्वत:च्या मालकीच्या ‘हॉटेल कृष्णा’मध्ये छत्रपतींचा पुतळा स्थापन केला. राजेश दररोज छत्रपतींचे पूजन व आरती करुन कामकाजाला सुरुवात करतो. अशाप्रकारे छत्रपती शिवरायांची आरती, पूजन होणारे हे देशातील पहिलेच हॉटेल असावे.

buldhana-hotel01

बुलढाण्यातील राजेश हेलगे या पदवीधर व्यक्तीने नोकरीच्या मागे न लागता 1986 ला हॉटेल व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. बुलढाणा बसस्थानकासमोर ‘हॉटेल कृष्णा’ नावाने व्यवसाय सुरू केला. राजेश यांनी आपल्या ‘हॉटेल कृष्णा’मध्ये गेल्या पाच वर्षापासून शिवाजी महाराजांचा पाच फुटाचा पुतळा व सहा देखावे भिंतीवर उभारलेले आहे. दररोज सकाळी हॉटेल सुरु झाल्यानंतर राजेश हेलगे व त्यांचे कर्मचारी वैभव तळेकर, सुरेश राजपूत, शैलेश राजपूत, राजेश खरात, शुभम खरात, गिरधर शेळके, गणेश चिंचोले, अनिल सरकटे, गजानन काळे, सुनील गवई, हुसेन अन्सारी हे सर्वजण रोज नित्यनियमाने शिवाजी महाराजांचे पूजन व आरती करतात. नंतरच हॉटेलचा व्यवसाय सुरु करतात. हॉटेल कृष्णामध्ये आपण जिकडे पाहावे तिकडे आपल्याला शिवाजी महाराजांचे देखावे व दर्शनी भागात पुतळा दिसतो. शिवाजी महाराजांच्या विचाराने झपाटलेल्या या तरुणाची पत्नी डॉ. सुषमा ही जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहे. तर मुलगा अभिजीत हा एम्स हॉस्पिटल भोपाळ येथे एमबीबीएस करतो. ते सुद्धा वेळोवेळी राजेश हेलगे यांच्या या शिवकार्यात सहभागी होऊन हातभार लावतात. राजेश हेलगे यांची शिवभक्तीमुळे ते संपूर्ण जिल्ह्यात परिचित असून अनेक ठिकाणी ते शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्यासाठी मदत करतात.

कुठून मिळाली प्रेरणा
हॉटेल व्यवसाय करत असताना शिवचरित्र राजेश यांच्या वाचनात आले आणि ते भारावून गेले. राजेश यांनी प्रथम शिवजयंती उत्सव, त्यांच्या राजमाता जिजाऊ, सांस्कृतिक क्रीडा केंद्रांमार्फत 1993 पासून सुरु केला. अलीकडे त्याचे सार्वजनिक शिवजयंतीत त्यांनी रुपांतर केले. त्यानंतर व्यायाम शाळा सुरू करुन तिथे वर्षातून दोन वेळा शिवकालीन शस्त्रे तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी, भवरा फिरविणे याचे निशुल्क प्रशिक्षण सुरु केले. आज पाचशेच्यावर मुला-मुलींनी हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराजाच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या गडकोटाची माहिती व्हावी यासाठी गडकोट मोहीम दरवर्षी जानेवारी महिन्यात राबवून शेकडो तरुणांना गडकोटाची माहिती करुन दिली. एवढेच नव्हे तर बुलढाण्यातील संगम चौकात 51 फुट उंचीचा शिवाजी महाराज पुतळा उभारण्याच्या कामात पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून 90 टक्के काम पूर्ण केले.