कानड्यांची दादागिरी! छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवला, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

5210

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात असलेल्या मनगुती गावामध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा रातोरात हटवण्यात आला आहे. 6 ऑगस्ट रोजी महाराजांचा पुतळा प्लॅस्टीकने झाकण्यात आला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 ऑगस्टला हा पुतळा हटवण्यात आला होता. त्या जागी पुतळ्यासाठी बांधलेला फक्त चबुतरा उरला होता. या गावातील शिवप्रेमींनी या पुतळ्याचे 5,6 आणि 7 ऑगस्टचे फोटो काढून ठेवले होते, ज्यामुळे तिथल्या प्रशासनाने पुतळा कसा हटवला हे समस्त हिंदुस्थानातील शिवप्रेमींना कळालं आहे. ही कानड्यांची दादागिरी असल्याची तिखट प्रतिक्रिया या घटनेनंतर शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.

या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा अशी इथल्या ग्रामस्थांची मागणी होती. ग्रामस्थांनी एकत्र येत महाराजांचा पुतळा उभा केला. मात्र, याला स्थानिक पोलिसांनी विरोध करत पुतळा हटवण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली होती. याचा निषेध करण्यासाठी मनगुतीचे ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांना नमतं घ्यावं लागलं होतं. ग्रामस्थांच्या रोषाचा आपल्याला सामना करावा लागणार हे कळाल्याने प्रशासनाने गुपचूप हा पुतळा हटवला.

सामना ऑनलाईनने या गावातील स्थानिकांशी फोनवरून संपर्क साधला आणि ही घटना कशी घडली त्याची माहिती घेतली. स्थानिकांनी सांगितले की जिथे हा पुतळा बसवण्यात आला आहे त्या ठिकाणी 3 गावांना जोडणारा चौक आहे. मराठी बांधवांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती की इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा.

ग्रामपंचायतीने या चौक परिसरात एकूण 5 पुतळे बसवण्याची परवानगी दिली होती. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचाही समावेश होता. इथल्या ग्रामस्थांनी प्रशासनाकडून आर्थिक सहकार्य मिळत नसल्याने स्वत: पैसे उभे करून 5 ऑगस्ट रोजी पुतळा उभारला होता. या पुतळ्याला स्थानिक कानड्यांनी विरोध करायला सुरुवात केल्याने प्रशासनाने गावातील लाईट 6 तारखेला घालवले आणि तरुणांना ताब्यात घ्यायला सुरूवात केली असं स्थानिकांनी सांगितलं आहे. हे केल्यानंतर प्रशासनाने गुपचूप पद्धतीने हा पुतळा हटवला. हा पुतळा पुन्हा बसवावा अशी मागणी मराठी बांधवांनी तसेच शिवप्रेमींनी केली आहे. जर असे झाले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या