चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव प्रख्यात हास्य-व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांना आज जाहीर झाला. मानपत्र, मानचिन्ह आणि तीन लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या 8 डिसेंबर रोजी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे होणाऱ्या रंगसंमेलन सोहळय़ात फडणीस यांना जीवनगौरव प्रदान करण्यात येईल.
शि. द. फडणीस यांनी गेली अनेक वर्षे सकस सर्जनशीलतेच्या प्रतिभेने रंगरेषांच्या माध्यमातून ‘हास्यचित्र’ या कलाप्रकाराला खास स्वतःचा असा आयाम दिला. इतकेच नव्हे तर, 25 वर्षांच्या काळात चित्रकला प्रकाराला, चित्रकाराला कॉपीराइट मिळवून देण्याचे प्रयत्नदेखील त्यांनी केले आणि त्यात ते यशस्वी झाले. वयाच्या शंभरीतही शि. द. फडणीस केवळ कार्यरत आहेत असे नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन ते आपला हात आणि आपली कला जागती, फुलती आणि बहरती ठेवत आहेत. सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या या बहुमोल योगदानाबद्दल चतुरंग जीवनगौरवसाठी निवड समितीने त्यांची एकमताने निवड केली असल्याचे प्रतिष्ठानने सांगितले.