‘कुनो’त चित्त्याचे आणखी दोन शावक दगावले, मोदींचा ‘प्रोजेक्ट चित्ता’ फेल

आफ्रिका खंडातील नामिबियातून गेल्यावर्षी आणलेला मादी चित्ता ज्वालाच्या आणखी दोन शावकांचा मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात मृत्यू झाला आहे. ज्वालाने मार्च महिन्यात चार शावकांना जन्म दिला होता. त्यातील एका शावकाचा दोनच दिवसांपूर्वी मृत्यू झाला असताना आता आणखी दोन शावक दगावल्याने खळबळ उडाली आहे. आता चारपैकी एकच शावक उरला आहे.

कुनो भागात तापमानाचा पारा 45 अंश सेल्सियसपार गेला असून उष्णतेच्या लाटेमुळेच या शावकांची प्रकृती खालावली व ते दगावल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. ज्वालाच्या चौथ्या शावकाचीही प्रकृती गंभीर असून त्याच्यावर पालपूर येथे उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. योग्य उपचार व्हावेत म्हणून नामिबिया तसेच दक्षिण आफ्रिकेतील तज्ञांचा सल्लाही घेतला जात आहे.

आफ्रिकेतून आणलेले चित्ते संकटात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘प्रोजेक्ट चित्ता’ राबवला गेला. त्यात पहिल्या खेपेत 8 चित्ते नामिबिया या आफ्रिकन देशातून आणण्यात आले. गेल्यावर्षी 17 सप्टेंबरला मोदींच्या वाढदिवशी या चित्त्यांना कुनो अधिवासात सोडण्यात आले. त्यानंतर यावर्षी 18 फेब्रुवारी रोजी आणखी 12 चित्ते दक्षिण आफ्रिकेतून आणण्यात आले. या 20 पैकी 3 चित्ते आतापर्यंत दगावले आहेत. 26 मार्च रोजी साशा या मादी चित्त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर 23 एप्रिल रोजी उदय नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला तर 9 मे रोजी दक्षा चित्ता जखमी अवस्थेत सापडला आणि नंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आता 20 पैकी 17 चित्ते उरले असतानाच तीन शावकही दगावल्याने वनविभागाचे धाबे दणाणले आहेत.