लातूरमध्ये बारावी परीक्षा केंद्राच्या संचालकास मारहाण

29

सामना प्रतिनिधी।जळकोट

पाटोदा ( बु.) ता.जळकोट येथील ज्ञानविकास उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावी परीक्षा केंद्रावर केंद्र संचालकांस एका अज्ञाताने शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

पाटोदा (बु.) येथील ज्ञानविकास उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीचे परीक्षा केंद्र आहे. याठिकाणी २६३ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. सोमवारी केंद्रसंचालक अनिल व्यंकटराव जाधव यांना एक अज्ञात व्यक्ती सतत परीक्षा केंद्रावर ये – जा करत असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्या तरुणास समज दिली. पण तरीही तो वारंवार केंद्रावर चकरा मारत होता. यामुळे जाधव यांनी त्यास रोखण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने त्या अज्ञाताने जाधव यांना शिवीगाळ करण्याबरोबरच लाथाबुक्कयांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर जाधव यांनी पोलिसात तक्रार केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रसेन देशमुख हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या