चेंबूरमध्ये उद्रेक! बेपत्ता मुलीचा शोध नाही; बापाची आत्महत्या… लोकभावनेचा भडका

2385

मुलगी बेपत्ता झाल्याने धसका घेतलेल्या बापाने रेल्वेखाली आत्महत्या केली. 14 ऑक्टोबरची ही घटना. मात्र तेव्हापासून चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीत पोलिसांविरोधात संतापाची आग धुमसत होती. नागरिकांनी बापाचा मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. आज त्याच्यावर अखेर अंत्यसंस्कार करण्यात आले, पण अंत्ययात्रेवेळेस जमावाचा उद्रेक झाला. शीव-पनवेल मार्ग तर रोखण्यात आलाच, पण पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. पोलिसांच्या गाडय़ांची नासधूस, दगडफेक यामुळे परिसरात दुपारी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांची जादा कुमक आली आणि त्यांनी लाठीचार्ज करताच हा जमाव पांगला.

कुर्ला येथील ठक्कर बाप्पा कॉलनीत राहणारे पंचाराम यांची मुलगी गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. नेहरूनगर पोलीस तिचा कसून शोध घेत असतानाही तिचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने पंचाराम यांना नैराश्य आले होते आणि त्यातूनच त्यांनी 14 ऑक्टोबर रोजी लोकलखाली झोकून देत आत्महत्या केली. तेव्हापासून ठक्कर बाप्पा कॉलनीतील रहिवासी व रिठारिया यांच्या गाववाल्यांनी पंचाराम यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. अखेर आज पंचाराम यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांनी ताब्यात घेतला. त्यानंतर ठक्कर बाप्पा कॉलनीतून पंचाराम यांची अंत्ययात्रा निघाली.

थेट स्मशानभूमीत न जाता

अंत्ययात्रा थेट स्मशानभूमीत न जाता कॉलनीतील रहिवाशांनी मृतदेह कुर्ला रेल्वे स्थानकाजवळून मग नेहरूनगर पोलीस ठाण्यावर नेला. तेथे घोषणाबाजी केल्यानंतर अंत्ययात्रा स्मशानभूमीच्या दिशेने निघाली. यावेळी अडीच ते तीन हजार जणांचा जमाव अंत्ययात्रेत सहभागी झाला होता. अंत्ययात्रा शीव-पनवेल महामार्गावरील उमरशी बाप्पा चौकात येताच जमावाने ठिय्या देत पोलिसांविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे वाहतुकीस अडथळा होऊ लागल्याने पोलिसांनी जमावास रस्त्यातून बाजूला हटण्याचे आवाहन केले, पण त्याचवेळी जमाव बिथरला आणि त्यांनी दगड, चप्पल तसेच हातात जे मिळेल ते पोलिसांच्या दिशेने भिरकवण्यास सुरुवात केली. हजारोचा जमाव अचानक आक्रमक झाल्याने परिसरात तणावाची परिस्थिती झाली.

अनेक पोलीस जखमी

जमावातील तरुणांनी गाडय़ा, दुकानांवर दगडफेक करीत पोलिसांवर तुफान हल्ला चढवला. या हल्ल्यात वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण तेजाळे तसेच नेहरूनगर पोलीस ठाण्याचे राजेंद्र गावीत, गोरख साबळे हे अंमलदार जखमी झाले. तसेच अनेक पोलिसांना मुका मार लागला. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

आजचा प्रकार ठरवून झाला

पंचाराम यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात येत नव्हता. गेल्या 10 दिवसांपासून कॉलनीत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मृतदेह ताब्यात घेतला जाईल याची पोलिसांना कुणकुण होती. त्यानुसार आज पंचाराम यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. रिठारिया कुटुंबीयांनी त्यांची मुलगी बेपत्ता होण्यामागे ज्यांच्यावर संशय व्यक्त केला त्यांना नेहरूनगर पोलिसांनी अटकदेखील केली, मात्र तरीसुद्धा पंचाराम यांची अंत्ययात्रा कुर्ला रेल्वे स्थानकमार्गे नेहरूनगर पोलीस ठाण्यावर नेण्यात आली. आचारसंहिता सुरू असल्याने त्यात असे बेकायदेशीरपणे करण्याची गरज नव्हती. जमावात सहभागी अनेक तरुण दारूच्या नशेत होते आणि त्यांनीच पोलिसांविरोधात घोषणाबाजी करीत दगडफेक केली. हा सर्व प्रकार पद्धतशीर ठरवून घडविण्यात आला असून यामागच्या सूत्रधारांना लवकरच बेडय़ा ठोकू असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान. आजच्या हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चेंबूर पोलीस ठाण्यात सुरू होते

खरे काय-खोटे काय

पोलिसांनी मुलीचा शोध लावला नाही म्हणून पंचाराम यांनी आत्महत्या केली असे रिठारिया कुटुंबीय आणि त्यांच्या गाववाल्यांचे म्हणणे आहे. तर मुलीचा आम्ही कसून शोध घेत आहोत. रिठारिया कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता होण्यास जबाबदार आहेत त्यांची नावे सांगितल्यानंतर त्यांना अटकही केली. आमचा सर्व तपास त्यांच्या समोर आहे. तपासात कुठलीही कुचराई केलेली नाही, पण तरीदेखील 14 तारखेपासून परिसरात हे प्रकरण तापवले गेले. पंचाराम यांचा मृतदेह 13 तारखेला रात्री 9.45 वाजता सापडला, पण त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी 9.15 वाजताच व्हायरल झाली होती. त्यातही पंचाराम यांना लिहिता येत नव्हते. पंचाराम यांचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला तेदेखील संशयास्पद असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे नेमके सत्य काय, असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यावर लवकरच सर्व सत्य समोर येईल असा दावा पोलिसांनी केला आहे.

पोलीस म्हणतात…

जमावातील अनेक जण दारूच्या नशेत होते आणि त्यांनीच पोलिसांविरोधात घोषणाबाजी करीत दगडफेक केली. हा सर्व प्रकार पद्धतशीर ठरवून घडविण्यात आला असून यामागच्या सूत्रधारांना लवकरच बेडय़ा ठोकू.

तपासात कुठलीही कुचराई केलेली नाही, पण तरीदेखील 14 तारखेपासून परिसरात हे प्रकरण तापवले गेले. पंचाराम यांचा मृतदेह 13 तारखेला रात्री 9.45 वाजता सापडला, पण त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी
9.15 वाजताच व्हायरल झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या