स्वस्त भाज्या आणि आरोग्याचा प्रश्न

266

dr-namrata-bharambe>> डॉ. नम्रता महाजन-भारंबे

आज रेखा मावशी खूप आनंदात घरी आल्या आणि हातातली बाजाराची पिवशी टेबलवर ठेवत असतांनाच ”अहोss आज एवढी ताजी, बहारदार भाजी मिळाली म्हणून सांगू…बघा किती फ्रेश एकदम! आणि तो भाजीवाला अगदी १५रु. जूडी विकत होता म्हणून मी एकदमच ६-७ जोड्या घेतल्या. नाहीतरी मुंबईतल्या महागाईत कुठे एवढे स्वस्त मिळणार?” मावशी अगदी मी कशाप्रकारे युद्ध जिंकून घरी आले त्याचे यथासांग वर्णन करीत होत्या! आणि तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणाला आई, नाल्यावरच्या पाण्यावर घेतलेल्या असतील नक्की. काकूंनी त्याला गप्प बस रे! तुला काय कळतं त्यातलं, असे म्हणून गप्प बसवले.

पण खरंच त्यांच्या मुलाचे बोलणे योग्य नव्हते का? अगदी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर लाइन कोणत्याही लोकल ट्रेनने प्रवास करताना बाहेर नजर टाकली. तर तुम्हाला छान फुललेला भाज्यांचा मळा दिसतो. लाल-हिरव्या रंगाचे हे मळे म्हणजे डोळ्यांसाठी आल्हाददायी अनुभव असतो आणि जरा हे मळे संपले की ८-१० फुटांवर एक नाला असतो, ज्यामध्ये संपूर्ण शहराचे सांडपाणी, कंपन्यांचे ड्रेनेजचे पाणी वाहत असते आणि त्याच्या शेजारी कचऱ्याचा ढिग! अगदी ‘दुरून डोंगर साजरे’ या म्हणीचे सुयोग्य उदाहरण!

या मळ्यांमध्ये मुख्यत्वेकरुन पालक, माठ, चवळी, लाल माठ, मेथी, मुळा, गाजर, कोबी इ. भाज्या घेतल्या जातात. यांपैकी एक किंवा दोन भाज्या आपल्या एका वेळच्या जेवणात असतात.

यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी नोंदविल्या आहेत. काही व्यक्तींनी या भाजीपाल्यांच्या विश्लेषक चाचण्या घेतल्या तेव्हा त्यांचे रिपोर्टस फारच धक्कादायक आहेत. रिपोर्टस अनुसार या भाज्यांमध्ये कॅडमिअम, क्रोमिअम, कोबाल्ट, झिंक, शिसे, आर्सेनिक अशा घातक द्रव्यांचे अंश आढळले. हे अंश ‘जागतिक आरोग्य संघटना (WHO)’ ने दिलेल्या कमाल निर्देशांकांपेक्षा अनेक पटींनी जास्त आहेत. तसेच या भाज्यांचे सेवन दिर्घकाळ केले असता, पार्किन्सन्स सारखे मज्जातंतूचे आजार, डोळ्याचे व कानाचे विकार व कार्यक्षमता कमी होणे, पोटाचे विकार होतात. लहान मुलांमध्ये मुत्रसंस्थेचे विकार होऊ शकतात.

पावसाळ्यामध्ये तर या भाज्या खाणे म्हणजे पोटाच्या विकारांना आमंत्रण देण्यासारखेच आहे.

यावर उपाय म्हणून अनेकांनी पालेभाज्या खाणे सोडून दिले आहे. पण हा उपाय आहे का? आहार हे औषध आहे. आणि काही जण याला काही इलाज आहे का? मी एकटाच थोडी खात आहे? एवढी दुनिया खाते कुणाला काय झालंय? पण मुळात ‘चलता है’ वाला अॅटिट्यूड खूप घातक असतो. एखादा दुर्मिळ आजार एखाद्यालाच होत असतो.

यासोबतच आणखी दुर्लक्षित झालेली बाब म्हणजे भाज्यांची हाताळणी. बहुतांश वेळा भाज्या घेतांना भरपूर जुड्या हाताळून मग घेतल्या जातात. म्हणजे आपल्या पिशवीत भाजी येईपर्यंत ती कमीत कमी ५०-६० हातांच्या संपर्कात येते. तसेच भाजी विक्रेते भाज्या सरळ खाली रस्त्यांवर मोकळ्या करतात आणि ‘दस रुपये-दस रुपये’ असे म्हणत त्यांची विक्री सुरू होते. स्वस्तात मस्त म्हणून ग्राहक खूश! कुणीतरी म्हटले आहे, आपल्याकडे लोक ‘जहर से नही दाम से डरते है’ अगदी पाणी देखील पॅकेज्ड घेणारे आपण या गोष्टींकडे कानाडोळा का करत आहोत?

आपण सगळे आधुनिकीकरणच्या दुष्टचक्रात अडकत आहोत. शहरी झगमगाटामध्ये भौतिक स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपण आपल्या शरीराची आहुती देत आहोत. पैसा कमविण्यासाठी लागणारे कष्ट हे शरीर करत असते आणि या शरीरासाठी आपण काय करतो? व्यायाम, योगसाधना, प्राणायाम यासाठी आपल्याकडे रोज एक तासाचा अवधी नसतो. हवा प्रदुषित, पाणी प्रदुषित, अन्न प्रदुषित! जर आपण आपल्या शरीराला आरोग्यदायी सुविधा पुरवू शकत नाही, तर आपल्याला उत्तम आरोग्यदायी शरीराची साथ मिळण्याची अपेक्षा तरी कशी ठेवावी? कधीतरी शरीर संप पुकारेलच की! मजेचा भाग सोडला तर आता या दुष्टचक्रात वाहवत जायचे, की कुठेतरी पॉज घेऊन बाहेर पडायचे हे प्रत्येकाने वेळीच ठरविणे खूप आवश्यक झाले आहे. कारण शेवटी
”जान है, तो जहाँ है !”

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. [email protected] 

फोन क्र. ९८२०२१५७९६

आपली प्रतिक्रिया द्या