तारापूरमध्ये केमिकल टँक फुटून विषारी वायू पसरला; नागरिकांमध्ये घबराट

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्यात सोमवारी सकाळी केमिकल टँक फुटून रसायनातून निघालेल्या वायूमुळे परिसरातील नागरिकांना त्रास जाणवला आहे. कारखानाच्या परिसरात पसरलेल्या वायूमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नंबर 16/25 केमिकॉन केमिकल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या रासायनिक कारखान्यात सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अचानक विषारी वायूगळती झाल्याने बाजूला असलेल्या कारखान्यातील कामगारांना त्रास होऊ लागला. यावेळी त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तपासणी केली असता रसायनाची एक टाकी फुटून त्यातून वायु निघाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कारखान्यातील रसायनाची टाकी फुटून निघालेल्या रसायनातील गॅस फॉर्मलडीहाईड असून या वायूने डोळ्यात जळजळ होणे, घसा कोरडा पडणे व चक्कर येणे असे त्रास जाणवतात. याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांना आणि पत्रकारांनाही वायूचा त्रास जाणवला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी ऑक्सिजन सिलेंडर लावत कारखान्यात पसरलेल्या रसायनावर कॉस्टीक सोडा टाकून रसायन व त्यातून निघणाऱ्या वायूचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या