पाकिटबंद महागडे तांदूळ आरोग्यासाठी अपायकारक!

89

सामना ऑनलाईन। चेन्नई

जर तुम्ही पण पाकिटबंद ब्रॅण्डेड त्यातही ब्राऊन राईस खात असाल तर सावधान! कारण जो तांदूळ तुम्ही आरोग्यासाठी उत्कृष्ट असल्याचे समजून खात आहात तो तुमचे आरोग्य बिघडवू शकतो अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मद्रास डायबिटीक रिसर्च फाऊंडेशनने (MDRF) खास बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या 15 पाकिटबंद आरोग्यदायी तांदळाची चाचणी केली. त्यात या कंपन्यांनी केलेला दावा फोल असल्याचे समोर आले आहे.

या चाचणीत पॉलिश न केलेले, शेतातून थेट बाजारात विक्रीस आणलेले असा दावा करणाऱ्या कंपनीच्या ब्रॅण्डेड तांदळाची चाचणी करण्यात आली. तसेच खास डायबिटीस असलेल्यांसाठी या नावाखाली कंपन्या विकत असलेल्या ब्राऊन राईसचीही चाचणी करण्यात आली. त्यावेळी ते तांदूळ अर्धवट शिजवलेले व नंतर मशीन आणि उन्हात वाळवलेले साधे तांदूळ असल्याचे संशोधकांना आढळले. MDRFच्या संशोधक सुधा वासुदेवन यांनीही यास दुजोरा दिला आहे. आमच्याकडे रोज डायबिटीस असलेले रुग्ण मोठ्या संख्येने येतात. येताना ते त्यांच्या आहारात समावेश असलेले तांदूळ नमुनादाखल घेऊन येतात. पण याच रुग्णांना डायबिटीस झाल्याचे आढळले. यातील बरेचजण बाजारात मिळणाऱ्या जीरो कॉलेस्ट्रॉल आणि शुगरफ्री तांदूळचा वापर करत असल्याने आम्ही अशा 15 प्रकारच्या तांदळांच्या नमुना चाचणी केली. त्यावेळी धक्कादायक अशी माहिती समोर आली असे वासुदेवन यांनी सांगितले.

यातही डायबिटीस रुग्णांसाठी आरोग्यदायी असा दावा करणाऱ्या ब्राऊन राईसच्या कंपन्यांनी त्यांच्या तांदळात ग्लिसेमिक इंडेक्स म्हणजेच कार्बोहाइड्रेट (GI) अवघा 8.6 असल्याचे सांगितले. पण आंतरराष्ट्रीयस्तरावरील GI च्या प्रमाणानुसार इतके कमी GI कधीच कुठल्या तांदळात नसते. तांदळात कमीतकमी 40 GI आढळतात. कार्बोहायड्रेट रक्तातील साखरेवर नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. तसेच या तांदळाचा आहारात समावेश केल्यास डायबिटीस 2 चा धोका टाळता येतो, असेही वासुदेवन यांनी म्हटले आहे.

तर संशोधक शोभना यांनी चाचणीमध्ये कंपन्या तांदूळ आधीच शिजवत असल्याचे व ते तांदूळ पॉलिशविरहीत असल्याचे आढळले. तांदूळ शिजवल्यामुळे त्याचा रंग ब्राऊन होतो. हा तांदूळ शिजवताना जास्त पाणी शोषून घेतो. ज्यामुळे त्याचा स्टार्चचा स्तर वाढतो. त्यामुळे GI चा प्रमाणही वाढते असेही त्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या