
चेन्नई सुपर किंग्जचा धुरंधर फलंदाज अंबाती रायडूने आयपीएलच्या विजेतेपदाच्या सामन्यापूर्वी निवृत्तीची घोषणा केली आहे. गुजरात टायटन्सविरुद्धची फायनल ही आपल्या आयपीएल कारकिर्दीतील अखेरचा सामना असेल, असे त्याने रविवारी ट्विटरवर जाहीर केले. 2019 मध्ये विश्वचषक संघात निवड न झाल्याने निवृत्त झालेला अंबाती रायडू 5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱया संघाचा भाग आहे. या खेळाडूने आपल्या फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलचा चॅम्पियनही बनवले होते.
अंबाती रायडूने ट्विटमध्ये लिहिले, ‘मुंबई आणि सीएसके 2 सर्वोत्तम संघ, 204 सामने, 14 हंगाम, 11 प्लेऑफ, 8 फायनल, 5 ट्रॉफी. आशेने आज रात्री सहावी. बराच लांबचा प्रवास झाला. मी ठरवले आहे की, आज रात्रीचा आयपीएलमधील हा माझा शेवटचा सामना असेल. मला ही स्पर्धा खेळताना खूप आनंद झाला. तुम्हा सर्वांचे आभार. यू-टर्न नाही.’
अंबाती रायडूने 2010 मध्ये आयपीएल करीअरला सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्जव्यतिरिक्त अंबाती रायडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग आहे. रायडू (अंबाती रायडू) 2018 पासून सीएसकेकडून खेळत आहे. अंबाती रायडूने आयपीएलमध्ये आतापर्यंत 203 सामन्यांत 28.29च्या सरासरीने 4329 धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये 22 अर्धशतके आणि 1 शतक झळकवले आहे.
2019 मध्ये निवृत्ती घेऊन केले होते पुनरागमन
याआधीही अंबाती रायडूला 2019 वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळाले नव्हते. विश्वचषकासाठी स्टँडबाय म्हणून त्याच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर रायडूला राग आला आणि त्याने जुलै 2019 मध्ये क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र, दोन महिन्यांनंतर त्याने निवृत्ती मागे घेतली आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला ईमेल पाठवून पुन्हा क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली. यापूर्वी 2018 मध्ये रायडूने मर्यादित षटकांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.