चेन्नई चॅम्पियन, पण बक्षिसांमध्ये गुजरातची बाजी

अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखायला लावणाऱया लढतीत चेन्नई सुपरकिंग्जने बाजी मारत कारकीर्दीत पाचव्यांदा आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले. याचबरोबर चेन्नईने मुंबई इंडियन्सच्या पाच जेतेपदाच्या विक्रमाची बरोबरी करणाऱया चेन्नईला 20 कोटी रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सर्वाधिक पारितोषिक रक्कम चेन्नईला मिळाली असली तरी सर्वाधिक वैयक्तिक बक्षिसे ही उपविजेत्या गुजरात टायटन्सच्या खेळाडूंना मिळाली, हे विशेष.

विजेतेपद राखण्यात अपयशी ठरलेल्या उपविजेत्या गुजराज टायटन्सला 12.5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. याचबरोबर तिसऱया स्थानावर राहिलेल्या मुंबई इंडियन्सला 7 कोटी, तर चौथ्या स्थानावरील लखनौ सुपर जायंट्सला 6.5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. आयपीएलच्या पहिल्या सत्रात विजेत्याला 4.8 कोटी रुपये मिळाले होते. त्याच वेळी उपविजेत्याच्या बॅगमध्ये 2.4 कोटी रुपये आले. तेव्हापासून बक्षिसाची रक्कम अनेक पटींनी वाढली आहे, मात्र गेल्या काही वर्षांपासून बक्षिसाच्या रकमेत वाढ झालेली नाही.

गुजरातच्या खेळाडूंना 9 पैकी 6 बक्षिसे!

आयपीएलची फायनल हरलेल्या गुजरात टायटन्सच्या तीन खेळाडूंनी 9 पैकी 6 वैयक्तिक बक्षिसे जिंकली. यात शुभमन गिलने सर्वाधिक 4 वैयक्तिक पारितोषिके जिंकून गिलने 40 लाख रुपयांची बक्षिसे जिंकली. पर्पल, ऑरेंज कॅप जिंकणाऱया खेळाडूंसह, हंगामातील सर्वात जास्त षटकार मारणाऱया व इमर्जिंग प्लेयरवरही पैशांचा वर्षाव करण्यात आला.

आयपीएलच्या 16 व्या हंगामातील वैयक्तिक बक्षिसे

इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर – यशस्वी जैस्वाल (10 लाख रु), पर्पल कॅप – मोहम्मद शमी – 28 बळी (10 लाख रु), ऑरेंज कॅप – शुभमन गिल – 890 धावा (10 लाख) , हंगामातील सर्वाधिक षटकार – फाफ डय़ुप्लेसीस – 36 षटकार (10 लाख रु.) , गेम चेंजर ऑफ द सीझन – शुभमन गिल (10 लाख रु) , मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर – शुभमन गिल – 10 लाख रु . मोसमातील सर्वात लांब षटकार – फाफ डय़ुप्लेसिस (10 लाख रु) , कॅच ऑफ द सीझन – राशिद खान (10 लाख रु) , पेटीएम फेअरप्ले पुरस्कार – दिल्ली कॅपिटल्स , हंगामातील सर्वोत्तम खेळपट्टी आणि मैदान – वानखेडे स्टेडियम आणि ईडन गार्डन्स (50 लाख रुपये) , सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन – ग्लेन मॅक्सवेल (10 लाख रु) , मोसमात सर्वाधिक चौकार – शुभमन गिल (85) – 10 लाख रु.