
सामना ऑनलाईन । मुंबई
आयपीएल २०१८ चा शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघामध्ये होणार हे आता निश्चित झाले आहे. रविवारी २७ मे रोजी वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार आहे. चेन्नईने पहिल्या क्लालिफायर सामन्यात हैदराबादचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेस केला होता, तर शुक्रवारी कोलकाताचा पराभव करत हैदराबादने फायनल गाठली आहे. रविवारी होणाऱ्या फायनल सामन्यात चेन्नईच्या या सहा धुरंधर खेळाडूंवर सर्वांची नजर असणार आहे. या खेळाडूंची कामगिरी दमदार झाल्यास चेन्नईला २०११ नंतर पहिल्यांदा आयपीएल जिंकण्याची संधी आहे.
महेंद्रसिंह धोनी
आयपीएलच्या ११ व्या सत्रात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा जुन्या दिवसांची आठवण करून दिली आहे. धोनीने यंदाच्या आयपीएलमध्ये गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली आहे. धोनीने १५ सामन्यात ७५.८३ च्या सरासरीने आणि १५०.६६ च्या जबरदस्त स्ट्राईकरेटने ४५५ धावा कुटल्या आहेत.
अंबाती रायडू
चेन्नईला फायनलमध्ये पोहोचवण्यात अंबाती रायडूचे मोठे योगदान आहे. रायडूने १५ सामन्यात ४१.८५ च्या सरासरीने आणि १५३.०० च्या स्ट्राईकरेटने फलंदाजी करताना ५८६ धावा ठोकल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचा आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. बॅटिंग ऑर्डरमधील क्रम बदलला तरी बॅटिंगमध्ये फरक पडत नाही.हे रायडूने दाखवून दिले. विशेषत: सनरायझर्सविरुद्ध त्याची कामगिरी नेहमीच बहरदार झाली आहे.
फॅफ डू प्लेसिस
चेन्नईचा हा जुना शिलेदार दुखापतीमुळे सुरुवातीचे सामने खेळू शकला नव्हता. त्याच्या पुनरामनानंतर चेन्नईच्या फलंदाजीची खोली आणखी वाढली आहे. डू प्लेसिस आतापर्यंत स्पर्धेत फक्त पाच सामने खेळला असून यात त्याने ३८.०० ची सरासरी आणि १२८.८१ च्या स्ट्राईकरेटने १५२ धावा केल्या आहेत. पहिल्या क्लालिफायर सामन्यात डू प्लेसिसच्या नाबाद अर्धशतकीय खेळीच्या जोरावर चेन्नईने हैदराबादचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला.
सुरेश रैना
सुरेश रैना हा चेन्नईच्या संघाचा आधारस्तंभ आहे. यंदा रैनाने १४ सामन्यात ३७.५४ च्या सरासरीने आणि १३२.३७ च्या स्ट्राईकरेटने ४१३ धावा केल्या आहेत. यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. आता फायनलमध्ये चेन्नई समर्थक तो मैदानात उतरला की ‘रैना बरसे…’ हे गाणे गाणार हे नक्की
ड्वेन ब्राव्हो
वेस्ट इंडिजचा हा खेळाडू चेन्नईच्या मिडल ऑर्डरला बळकट करतो आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अवघड सामनेही जिंकून देतो. ब्राव्होने यंदा सलामीच्या सामन्यात मुंबईविरुद्ध तुफानी खेळी केली होती. तर गोलंदाजीने ब्राव्होने १५ सामन्यात ९.८३ च्या इकॉनॉमी रेटने १५ बळी घेतले आहेत. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्याचा तगडा अनुभव ब्राव्होकडे आहे. हाच तगड अनुभव फायनलमध्ये निर्णयाक ठरणार आहे.
लुंगी निगडी
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी निगडीने चेन्नईसाठी दमदार कामगिरी केली आहे. निगडीने मिळालेल्या संधीचे सोने करत सहा सामन्यात दहा बळी घेतले आहेत. त्यामुळे अखेरच्या सामन्यात हैदराबादचा सलामीवीर धवन आणि विलियम्सनसमोर निगडीच्या उसळत्या चेंडूंचा सामना करण्याचे आव्हान असणार आहे.