‘बस डे’ साजरा करताना विद्यार्थी बसमधून पडले

सामना ऑनलाईन। चैन्नई

तमिळनाडुची राजधानी चेन्नई येथे ‘बस डे’ साजरा करताना काही मस्तीखोर विद्यार्थ्यांनी घातलेल्या गोंधळामुळे चालत्या बसमधून अनेकजण खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी 24 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.

मंगळवारी बस डे असल्याने पच्चईअप्पास कॉलेजजवळ महानगर परिवहनच्या 40 क्रमांकाच्या बसमध्ये अनेक विद्यार्थी चढले होते. बसमध्ये मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी चढल्याने बसचालक व वाहकाने त्यांना खाली उतरण्यास सांगितले. पण विदयार्थ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत गोंधळ घालणे सुरूच ठेवले. कॉलेजच्या नावाने जोरात घोषणा देत ते आरडाओरडा करत होते. तर काहीजण बसच्या टपावर उभे राहून मस्ती करत होते. त्याचवेळी अचानक बस थांबली व टपावर उभे असलेले अनेक विद्यार्थी खाली पडले. यातील अनेकजण किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी गोंधळ घालणाऱ्या 24 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आले आहे.