टिक टॉकला विरोध केल्याने महिलेची विष पिऊन आत्महत्या

45

सामना ऑनलाईन। चेन्नई

तमिळनाडूमध्ये टिक टॉकच्या वेडापायी एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिता (24) असे मृत महिलेचे नाव आहे. अनिता ही टीकटॉकच्या आहारी गेली होती आणि तिच्या पतीने टीकटॉक वापरू नको असं सांगितल्याने तिने विष पिऊन आत्महत्या केली.

अनिताचा पती पलनिवेल हा सिंगापूरमध्ये नोकरी करतो. अनिता अरियालूर येथे सासू- सासरे व आपल्या दोन मुलांसह राहत होती. काही महिन्यांपूर्वी तिच्या एका मैत्रिणीने तिला टिक टॉक व्हिडीओ अॅपबद्दल सांगितले. त्यानंतर अनिताला टिक टॉकवर व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे व्यसनच जडले. दिवस रात्र ती टिक टॉकवरच असायची. मुलांकडेही तिचे लक्ष नव्हते. याबद्दल घरातल्यांनी तिला अनेकवेळा समजही दिली. पण अनितामध्ये काहीही फरक पडला नाही. त्यातच परिक्षेत तिच्या दोन्ही मुलांना कमी मार्क मिळाले. यामुळे पतीने तिला फोनवर खडसावले व टिक टॉकचे व्यसन सोडून मुलांकडे लक्ष देण्यास सांगितले. यामुळे अनिता भलतीच रागावली होती. आपला अपमान झाला आहे असा समज करून घेत तिने विष प्यायले. विशेष म्हणजे विष पित असतानाचाही व्हिडीओ तिने काढला व पतीला व्हॉट्सअॅपवर पाठवला. अनिता विष पित असल्याचे बघून पती हादरला त्याने घरातल्यांना फोन करून अनिताला तात्काळ रुग्णालयात नेण्यास सांगितले. यादरम्यान अनिताची तब्येत ढासळली आणि अखेर तिचा रुग्णालयात मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या