रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीच्या बैठकीत, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती दिली. रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर दिसला. मात्र या बैठकीत आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे व्यापारी वर्ग, बँका, संस्था, शिक्षण आणि आर्थिक जगतातील लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
आरबीआयने या बैठकीत आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. चेक क्लिअर होण्याकरीता आत्तापर्यंत दोन दिवसांचा कालावधी लागत होता. यापुढे चेक क्लिअर होण्यासाठी फक्त काही तास लागणार आहेत. ज्या दिवशी बँकेत डिपॉझिट कराल त्याच दिवशी अगदी काही तासातचं खात्यात रक्कम जमा होणार आहे. यामुळे चेक देणारे आणि पैसे घेणारे या दोघांनाही याचा फायदा होणार आहे. तसेच त्यांच्या संपूर्ण प्रक्रियेला गती मिळाल्याने बँकिंगवरही सकारात्मक परिणाम दिसून येईल.