चेरी अमोल बावडेकर

अंशुमन विचारे

अमोल बावडेकरांची लेक चेरी. अत्यंत लाडावलेली आणि तितकीच आपल्या संपूर्ण कुटुंबाची अत्यंत काळजी घेणारी…

मित्रांनो, मी कधी लेख लिहू शकेन असं मला बापजन्मातसुद्धा वाटलं नव्हतं. कारण मला माझ्या नाव-ऍड्रेसव्यतिरिक्त काहीही लिहिता यायचं नाही. पण ‘जिवलग’ या लेखनमालेच्या निमित्ताने आणि ‘सामना’ ‘फुलोरा’च्या प्रोत्साहन, विश्वास, जबाबदारी या सगळ्याच बाजूंमुळे प्रयत्न करतोय.

खरं तर मला डोडोविषयी जे प्रेम आहे त्याचं बीज कुठे तरी अमोलच्या घरात रुतलं असावं. कारण अमोलच्या आधी त्याचे वडील उत्तम गायक सुहास बावडेकर हे माझे मित्र होते. मी आणि गुरू ठाकूर सतत त्यांच्यासोबत असायचो. त्यावेळी त्यांच्याकडे रोजा नावाची पॉमेरियन जातीची कुत्री होती. ती आणि सुहास बावडेकर म्हणजे जणू एक दुजे के लिए फिल्म होती. मग अमोलचं प्रेरणाशी लग्न झालं. अमोलला मुलींची फार आवड. पण त्याला अद्वैत नावाचा गोंडस मुलगा झाला. मग त्याला बहीण मिरवायला हवी म्हणून मग ल्हासा ऍप्सो जातीची ‘चेरी’ घरात आली.

एक सांगू, माझ्या डोडोची चेरी आई आहे… आणि डोडोसुद्धा माझी बायको पल्लवी हिच्या हट्टापायी घरात आलाय… आणि मग काय तो आमचा आणि आम्ही सगळेच त्याचे झालो.

खरं म्हणजे चेरी अद्वैतला आवडते. त्याचा हट्ट आहे या सबबीवर घरात आली. कारण प्रेरणाच्या घरी म्हणजे माहेरी डॉबरमॅन आहे. तेव्हा घरी कुत्रा असल्यावर माणूस कसा एंगेज्ड होतो हे प्रेरणाला चांगलं ठाऊक आहे.

अमोल म्हणतो, मुलींमध्ये असणारे सर्व गुण चेरीमध्ये ठासून भरलेले आहेत. म्हणजे प्रेमळ, नखरेल, मिजासखोर, मुडी इत्यादी इत्यादी… म्हणजे तिचा मूड असेल तरच ती फोटो काढू देते. नाहीतर उठून दुसरीकडे निघून जाते. आता बोला.

अमोलच्या म्हणण्यानुसार त्याच्याकडे पाहुणे आले आणि त्यांच्या उठबसच्या गडबडीत चेरीकडे दुर्लक्ष झालं तर ती रुसते आणि विरुद्ध दिशेला तोंड करून बसते. मग याची धावाधाव… माफी मागणं… आणि मग नॉर्मल झाली की विजयी मुद्रेने पाहुण्यांसमोर येऊन बसते. तो म्हणतो, ल्हासा ऍप्सो या जातीच्या कुत्र्यांना जरा जास्त सांभाळावं लागतं. ही खूप केसाळ असल्याने त्यांची खूप निगा राखावी लागते. रोज केस विंचरणं, नियमित शाम्पू, तिचा परफ्यूम, अगदी मुलींच्या वरताण… तो म्हणतो, तिला सांभाळताना एखाद्या मुलीच्या बापाला जे सुख मिळतं तेच फिलिंग मला येतं.

तो म्हणतो, चेरीला शिळं अन्न चालत नाही. एकटीनं जेवणं चालत नाही. दुर्लक्ष केलेलं चालत नाही. आंबा फक्त हापूसच लागतो… काय नि काय…

अमोल म्हणतो, चेरीची खेळायची ठरावीक जागा अशी नाहीय. ती जे काही आपल्यासमोर आणेल ते फेकणे हा तिचा आवडता खेळ. कोणी उशिरा घरी आलं की त्याची वाट बघत दरवाजात बसणं… अद्वैत आजारी असला तर सतत शेपटी हलवत त्याच्याभोवती फिरणं. मी दौऱयावर निघालो की उदास तोंड करून बॅग भरेपर्यंत बाजूला बसणं… सगळंच अजब पण लाघवी.

तो म्हणतो, रात्र झाली की, जेवणं झाली की घाईघाईत बेडरूममध्ये शिरून आमच्या उशीवर मान टाकते. मग उरलेल्या उशीवर आम्ही झोपतो. सकाळचे ६ वाजले हे घडय़ाळ न बघता तिला कसं कळतं देवास ठाऊक… अमोल म्हणाला, एकदा बोट भाजलं होतं तर रात्रभर चाटून अगदी नॉर्मल केलं तिनं… एकदा पाय फ्रॅक्चर झाला होता तेव्हा मला त्रास होऊ नये म्हणून जवळसुद्धा फिरकली नव्हती. हे निष्पाप मन देवाने फक्त प्राण्यांनाच दिलं असावं ना…

अमोल म्हणतो, माझी मुलगी ‘चेरी अमोल बावडेकर’ हिला माणसाएवढं आयुष्य देवाने द्यावं एवढीच इच्छा…

माणसाचं मन कसं असतं ना… ज्याच्यावर जीव एकदा बसला की मरेपर्यंत सुटत नाही. म्हणूनच कदाचित आपण त्याला ‘माझा जिवलग’ असं म्हणतो ना… आणि ज्याला ज्याला त्याचा खरा जिवलग सापडलाय त्याच्यासारखा गर्भश्रीमंत माणूस या जगात तरी नाही. माझ्या आणि अमोलच्या या ‘चेरीमय’ गप्पांची सांगता त्याच्या सुंदर गाण्याने झाली. ‘मुस्कुराने की वजह तुम हो… गुनगुनाने की वजह तुम हो…’