संकटाच्या काळात महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्या अर्थाने तारणारा, सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प – छगन भुजबळ

आरोग्य, कृषी, महिला व बालकल्याण, शिक्षण, तीर्थस्थळे यांसह सर्वच क्षेत्रात भरीव तरतूद केल्यामुळे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादांचे अभिनंदन, अशा शब्दात अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे.

सोमवारी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प अजित पवार यांनी सादर केला. यात कोरोनामुळे झालेले लॉकडाऊन, आलेली संकटे समोर असताना देखील आणि राज्य सरकार मोठे अडचणीत असताना देखील अजित पवार यांनी राज्याच्या जनतेला तारणारा अर्थसंकल्प सादर केला याबद्दल अजित पवार यांचे अभिनंदन, असे कौतुकाचे उद्गार भुजबळ यांनी काढले.

ते पुढे म्हणाले की, कोरोनासारखे जागतिक संकट असूनही राज्याला पुन्हा प्रगतीकडे नेणारा सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प आहे. कोरोनाच्या संकटाने आरोग्य विषयक अनेक आव्हाने राज्यासमोर असताना अजित पवार यांनी आरोग्याला केंद्रस्थानी ठेवतच सर्वच विभागासाठी भरीव तरतुद केली आहे. आज महिला दिन आहे. त्यामुळे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठीची सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी प्रवास सवलत योजना राबवण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात येणार असल्याने राज्यातील मुलींना याचा फायदाच होणार आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मंडताना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे सुद्धा विशेष लक्ष दिले आहे. यामध्ये राज्यसरकाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गहू, तांदूळ, तूर, मका, इ धान्याची पुरेशी साठवणूक क्षमता निर्माण करण्यासाठी नाबार्डच्या साहाय्याने राज्यात 280 नवीन गोदामे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी आत्तापर्यंत 334 कोटीरुपये उपलब्ध झाले असून 2021-22 या वर्षासाठी 112 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्याच बरोबर चालू वर्षासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागास 321 कोटी प्रस्तावित केला आहे, असं म्हणत भुजबळ यांनी अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

राज्यात करोना आणि लॉकडाउनच्या काळात कृषी क्षेत्रानेच अर्थव्यवस्थेला सावरले असल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना घोषित केल्या आहेत. शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने कर्ज तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिलं जाणार असल्याची घोषणा आज अजित पवार यांनी केली. एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी 2 हजार कोटींच्या योजनेची घोषणाही आज करण्यात आली. कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी 1500 कोटींचा महावितरणला निधी दिला जाणार. तसेच विकेल ते पिकेल योजनेला 2100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी यावेळी दिली.

महाज्योती, सारथी व बार्टी या संस्थाना प्रत्येकी 150 कोटी रुपये निधी, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (ड), विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासप्रवर्गातील लाभार्थी करिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्यात येणार असल्याने नागरिकांना मोठा फायदा होणार आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

नाशिकच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारा अर्थसंकल्प-

नाशिक जिल्ह्यातील जनतेच्या सततच्या मागणीमुळे नाशिक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आज त्याचा पुनरुच्चार देखील अजित पवार यांनी आपल्या भाषणात केला. नाशिकसारख्या धार्मिक भूमीचा अधिक विकास करण्यासाठी सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर जतन संवर्धन, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर तीर्थ स्थळ विकास, संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर विकास, श्री क्षेत्र सप्तशृंगी गड विकास यासाठी भरिव निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुणे ते नाशिकच्या मध्यम अतिजलद रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यासाठी निधी आणि नाशिकच्या निओ मेट्रोसाठी राज्य शासनाच्या वाट्याची तरतूद केल्यामुळे संपूर्ण नाशिकच्या जनतेच्या वतीने छगन भुजबळ यांनी अर्थमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या