लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ, काय ठरवायचं ते लवकर ठरवा, भुजबळांच्या महायुतीला कानपिचक्या

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला साथ देत त्यांच्या सर्वाधिक जागा निवडून आणल्या आहेत. तर दुसरीकडे चाळीस जागा जिंकूचा दावा करणाऱ्या भाजप व महायुतीच्या नेत्यांना जनतेने या निवडणूकीत चपराक लगावली आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला 30 तर महायुतीला 17 जागा मिळाल्या आहेत. लोकसभेनंतर आता सर्व पक्षांनी विधानसभा निवडणूकीसाठी कंबर कसली आहे.

लोकसभा निवडणूकीत डावलल्यानंतर राज्यसभेच्या उमेदवारीची अपेक्षा असलेल्या छगन भुजबळ यांना पवार गटाने तिथेही डावलले. त्यामुळे सध्या छगन भुजबळ हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. भुजबळांनी उघडपणे त्यांना या उमेदवारींची अपेक्षा होती असे वेळोवेळी बोलून देखील दाखवले आहे.

दरम्यान आता छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महायुतीतील नेत्यांनाच कानपिचक्या दिल्या आहेत. ”युतीतील पक्षांनी लवकरात लवकर एकत्र बसून जागावाटपाचा प्रश्न सोडवावा. लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ, काय ठरवायचं ते लवकर ठरव. कारण पवार साहेब विधानसभेच्या कामाला लागले आहेत. त्यांचा प्रचार देखील सुरू झाला आहे. तशा प्रचाराला सुरुवात करावी लागेल. तेच तेच चर्चेचं गुऱ्हाळ करत राहिलो तर परत अडचणीत येऊ’, असे छगन भुजबळ म्हणाले.