शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटनेच्या चौकशीचे आदेश – छगन भुजबळ

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलांच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया शिबीरात बेडअभावी महिला रुग्णांची गैरसोय झाली होती. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यामार्फत आरोग्य विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठामंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

आरोग्य विभाग या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून चौकशी अहवाल सादर करणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे चौकशीचा अहवाल आल्यानंतर याप्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया झालेल्या महिला रुग्णांना दुसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच उपकेंद्रात नेण्याच्या सुचनाही गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

कोरोनाच्या संकटामुळे या काळात जिल्ह्यातील कुंटुंबनियोजन शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. लॉकडॉऊन शिथील झाल्यानंतर डिसेंबरपासून जिल्हयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांना सुरुवात झाली. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हा नियमित स्वरुपाचा कार्यक्रम असून नियमित स्वरुपात याची अंमलबजावणी करण्यात येते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 41 महिलांनी नोंदणी केली होती. प्राथमिक आरोग्य केद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बेडच्या उपलब्धतेबाबत रुग्णांना पूर्वकल्पना दिली होती. मात्र, बेडअभावी काही महिला रुग्णांची गैरसोय झाल्याचे निर्दशनास आल्याने अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांच्यामार्फत याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करू असे भुजबळ यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या